दहशतवादी हल्ल्यात एक सैनिक हुतात्मा
वृत्तसंस्था / जम्मू
जम्मू-काश्मीरमधील जम्मू दरबार भागातील भारतीय सैन्याच्या देखरेख चौकीवर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एक सैनिक हुतात्मा झाला आहे. सोमवारी सकाळी हा हल्ला करण्यात आला. या चौकीवर 36 इन्फंट्री ब्रिगेडचे सैनिक नियुक्त करण्यात आले होते. हल्ला केलेल्या दहशतवाद्यांना शोधण्यासाठी या भागात शोध अभियान हाती घेण्यात आली आहे. या भागात सैनिकांची गस्त वाढविण्यात आली असून वनप्रदेशांमध्ये दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे.
गेल्या आठवड्यात सुरक्षा सैनिकांनी पाकिस्तानातून होणाऱ्या घुसखोरीचे दोन प्रयत्न हाणून पाडले होते. त्यावेळी घुसखोरी करणारे दहशतवादी आणि सैनिक यांच्यात गोळीबार झाला होता. त्यानंतर या भागात घुसखोरांच्या हालचाली वाढल्याचे दिसून येत होते. म्हणून तेथे अतिरिक्त चौकी स्थापन करण्यात आली आहे. त्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले होते. नंतर कुपवाडा भागात आणखी एका दहशतवाद्याला टिपण्यात आले होते. तेव्हापासून या भागात तणावाचे वातावरण असून अनेक चकमकी झाल्या आहेत, अशी माहिती देण्यात आली.
तीन महिन्यांपासून अभियान
गेले तीन महिने सैनिकांनी या भागात आणि अन्य सीमावर्ती भागांमध्ये दहशतवाद्यांविरोधात जोरदार अभियान चालविले असून अनेक दहशतवाद्यांना यमसदनी धाडले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली असल्याने दहशतवाद्यांनी या निवडणुकांमध्ये अडथळा निर्माण करण्यासाठी हल्ल्यांच्या प्रमाणात वाढ केली आहे. त्यामुळे या भागांमध्ये सुरक्षा व्यवस्था अधिक वाढविण्यात आली असून सीमावर्ती भागांमध्ये अर्धसैनिक दलांच्या 300 तुकड्या नियुक्त करण्यात आल्या आहेत. गेल्या तीन महिन्यांमध्ये सैनिक आणि दहशतवादी यांच्यात किमान 15 चकमकी घडल्या आहेत.