भ्रष्टाचार निर्मूलनासाठी समाजक्रांती हवी
उपलोकायुक्त बी. वीरप्पा यांचे मत : सुवर्णविधानसौधमध्ये बेळगाव, बैलहोंगल उपविभागातील प्रलंबित प्रकरणांची सुनावणी
प्रतिनिधी/ बेळगाव
भ्रष्टाचार ही केवळ प्रशासकीय व्यवस्था किंवा सरकारी यंत्रणेपुरती मर्यादित समस्या नसून त्याला समाजातील प्रत्येक घटक प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे जबाबदार आहे. त्यामुळे केवळ लोकायुक्तांच्या कारवाईने भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन होऊ शकत नाही. त्यासाठी समाजातील प्रत्येक नागरिकाने भ्रष्टाचाराविरोधात ठाम भूमिका घेऊन त्याच्या निर्मूलनाचा संकल्प करणे आवश्यक आहे. भ्रष्टाचार करणाऱ्यांना समाजाने व त्यांच्या कुटुंबीयांनीही वाळीत टाकले पाहिजे, असे परखड मत उपलोकायुक्त न्यायमूर्ती बी. वीरप्पा यांनी व्यक्त केले.
शुक्रवारी सुवर्ण विधानसौधाच्या सेंट्रल हॉलमध्ये बेळगाव व बैलहोंगल उपविभागांतील प्रलंबित प्रकरणांच्या सुनावणी आणि निकालासाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. वीरप्पा म्हणाले, कायदेमंडळ व कार्यकारी मंडळाकडून अपेक्षित कामगिरी होत नसताना लोकशाहीचा चौथा स्तंभ मानली जाणारी न्यायपालिका आणि प्रसारमाध्यमेही कमकुवत होत आहेत. समाजात अन्याय घडतो, तेव्हा त्याविरोधात आवाज उठवून संविधानाचे संरक्षण करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी न्यायपालिका व प्रसारमाध्यमांवर आहे. कर्नाटक लोकायुक्त संस्थेने निष्पक्ष तपास व प्रभावी कार्यपद्धतीच्या माध्यमातून देशात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
निवडणुकीच्या काळात पैशाच्या आमिषाला बळी पडून मतदान करण्याची प्रवृत्ती लोकशाहीच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरत आहे. एकीकडे नागरिक घटनात्मक अधिकारांसाठी संघर्ष करतात, तर दुसरीकडे स्वत:च्या कर्तव्यांकडे दुर्लक्ष करतात. भ्रष्टाचारमुक्त काम करण्याची शपथ घेणारेच भ्रष्टाचारात सहभागी होणे ही गंभीर बाब आहे. भ्रष्टाचारमुक्त भारत निर्माण झाल्यास देश जगातील सर्वाधिक सामर्थ्यवान राष्ट्रांपैकी एक बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
लोकायुक्त संस्थेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे माजी सैनिक व त्यांच्या वारसांना संबंधित जिल्हा व तालुक्मयांच्या हद्दीत भूखंड उपलब्ध करून देण्याबाबत सरकारने आदेश जारी केला आहे. आता भूखंड निश्चित करून त्यांचे वाटप युद्धपातळीवर करण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत. माजी सैनिकांच्या निवासाचा प्रश्न सोडविण्यासाठी लोकायुक्तांनी केलेल्या प्रयत्नांचे हे महत्त्वपूर्ण फलित असल्याचे त्यांनी नमूद केले.
खोट्या तक्रारींमुळे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. सामाजिक कार्यकर्ते किंवा माहिती अधिकार कार्यकर्ते असल्याचे भासवून अधिकाऱ्यांविऊद्ध खोटे आरोप करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल. खोट्या तक्रारी सिद्ध झाल्यास संबंधित तक्रारदारांना तीन वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते. त्याचवेळी कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी जिल्हा प्रधान व सत्र न्यायाधीश मंजुनाथ नायक, जि. पं. सीईओ राहुल शिंदे, जिल्हा पोलीसप्रमुख के. रामराजन, लोकायुक्त उपनिबंधक अरविंद, डीएफओ एन. ई. क्रांती, अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी याच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी, तक्रारदार उपस्थित होते. लोकायुक्त जिल्हा पोलीसप्रमुख प्रसन्न देसाई यांनी स्वागत केले