सर्वानाच ब्रह्मप्राप्ती होऊ शकेल असे सहजसोपे उपाय
सामान्य माणसाला योगसाधना करून ब्रह्म प्राप्ती करून घेणे हे फार कठीण वाटते म्हणून योगगीतेमध्ये मुद्ग्लाचार्य ब्रह्मप्राप्ती होण्यासाठी काही सोपे उपाय सांगतात. ते म्हणतात, माणसाला मिळण्यास अशक्य ते सर्व आपल्याला मिळावे असे वाटत असते. अशा व्यक्तींनी अशक्य ते मिळवण्यासाठी का होईना पाप करणे सोडून देऊन सत्कर्मे करावीत. सुरवातीला जरी तो काही अपेक्षा ठेऊन कर्मे करत असला तरी या अपेक्षातून मिळणाऱ्या गोष्टी कायम टिकणाऱ्या नाहीत मग त्यांची अपेक्षा करा कशाला या विचारातून तो निष्काम कर्माकडे वळण्याचा निश्चय करेल. असा निश्चय झाल्यावर मुक्तीची इच्छा धरून गणेशादि पाच देवतांची उपासना सुरू करावी. संपूर्णत्व आणि सर्वपूज्यत्व इत्यादी गुणांमुळे गणेश हाच सर्वश्रेष्ठ आहे हे लक्षात घेऊन त्याच्या भक्तीत रममाण झाल्यावर गणेशाच्या कृपेने त्याचे चित्त पूर्ण शुद्ध होईल.
चित्ताला जिंकणं अत्यंत कठीण आहे म्हणून प्राणायामाने त्याच्यावर ताबा मिळवावा. एकदा श्वास आत घ्यायला चार सेकंद लागतात. त्याच्या चौपट वेळ म्हणजे सोळा सेकंद तो रोखून धरावा आणि आठ सेकंदात तो हळूहळू बाहेर सोडावा. याला अनुक्रमे पूरक, रेचक व कुंभक असे म्हणतात त्यांचे प्रमाण 4 : 16 : 8 असे आहे प्रथम डाव्या व नंतर उजव्या नाकपुडीने ही क्रिया करावी. याला अनुलोमविलोम प्राणायाम असे म्हणतात. हा प्राणायाम सतत करत रहावा म्हणजे मनुष्य पापमुक्त होईल.
योगसाधनेचे बाह्य व अंतर असे दोन प्रकार आहेत. बाह्य साधनेमध्ये व्रते, उपवास, तीर्थयात्रा इत्यादीसह स्वधर्माचरणाचा समावेश होतो तर आंतरसाधनेमध्ये प्राणायामचा समावेश होतो. प्राणायामामुळे प्राण आणि अपान वायुवर नियंत्रण मिळते व ते समप्रमाणात सुषुम्ना नाडीतून वाहू लागतात. त्यामुळे षटचक्रांचे भेदन होऊन योगी आत्मरुपाला पाहू शकतो. कोंडलेल्या वायूबळामुळे त्याचे चित्त अधिकच शुद्ध होईल व त्याची कोणतीही इच्छा पूर्ण होईल. अशावेळी योग्याने सावध रहावे आणि निरिच्छ असावे म्हणजे तो योगभ्रष्ट होणार नाही.
आता आणखी एका साधनाबद्दल सांगतो. यामध्ये शम दमाचा समावेश होतो. साधकाचे ध्येय ब्रह्मावर चिंतन करणे हे असते, त्यावरून चित्त विचलित होऊ लागले की, त्याला पुन्हा ब्रह्मावर लक्ष केंद्रित करायला लावणे याला शम म्हणतात तर जीवन चालण्याइतपत कार्य करून अधिकाची अपेक्षा न करता समाधानी राहणे याला दम म्हणतात. त्याचे चित्त त्याच्या स्वाधीन असते. तरीपण चित्ताच्या चंचल स्वभावामुळे ते पुन्हा विचलित होऊ लागले तर योग्याने सावध होऊन संपूर्ण निरिच्छ व्हावे. काहीही मिळवण्याची खटपट न करता स्वस्थ बसावे. यामुळे ध्यानादी कर्मे न करताही योगी थोड्या काळात चित्तावर विजय मिळवेल इतके हे शमदमादी साधन प्रभावी आहे.
ब्रह्मावर निष्ठा ठेवून स्वधर्माचे आचरण करत उपभोग घ्यावेत परंतु भोगाविषयी तुच्छतेची भावना असावी. असे केल्यानेही तो अंती स्वानंदलोकात पोहोचेल. भोगाविषयी तुच्छतेची भावना जे ठेऊ शकत नसतील त्यांनी प्रत्येक कर्म ब्रह्मार्पण बुद्धीने करावे. हे जमत नसेल त्याने नित्य, नैमत्तिक आणि काम्य अशा तिन्ही प्रकारच्या कर्माच्या फळाचा त्याग केल्यास त्याला योग साध्य होईल. ब्रह्मभूत होण्याचा सगळ्यात सोपा पण अत्यंत महत्त्वाचा उपाय म्हणजे नित्य गणेशस्मरण करत रहावे. म्हणजे अंतसमयी त्याचे स्मरण होण्याची बुद्धी श्रीगणेश त्याला देतात. श्रीगणेश प्रभूंचे व्रत, पूजन, कीर्तन, श्रवण यासारखे काहीही केले तरी ते अंती ब्रह्मभूतत्व द्यायला समर्थ असल्याने तो स्वानंद लोकात जाऊन योगाभ्यास करून श्रीगणेशात विलीन होतो.
क्रमश: