इम्रान यांच्या पक्षाने गमाविले चिन्ह
इस्लामाबाद :
इम्रान खना यांचा पक्ष पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय)चे निवडणूक चिन्ह ‘बॅट’ रद्द करण्यात आले आहे. पाकिस्तानच्या निवडणुक आयोगाच्या 5 सदस्यीय खंडपीठाने निवडणूक चिन्ह रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर पीटीआय या पक्षाला अवैध घोषित करण्यात आले आहे. पीटीआयमध्ये इम्रान खान यांच्या जागी गौहर अली खान यांना पक्षाध्यक्ष करण्यात आले होते. परंतु पक्षांतर्गत निवडणूक अवैध घोषित झाल्याने त्यांना हे पद गमवावे लागले आहे. निवडणूक आयोगाच्या कारवाईनंतर पीटीआयने पाकिस्तानच्या निवडणुकीत आम्हीच विजयी होऊ असे म्हटले आहे. आयोगाच्या निर्णयाच्या विरोधात आम्ही सर्वच स्तरावर दाद मागणार आहोत. आमचे सर्व उमेदवार बॅट या चिन्हावरच निवडणूक लढविणार असल्याचा दावा पीटीआयने केला आहे.
पाकिस्तानात 8 फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. इम्रान खान यांच्या पक्षाला तोपर्यंत निवडणूक चिन्ह प्राप्त न झाल्यास उमेदवारांना अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागणार आहे. अशा स्थितीत निवडणूक जिंकल्यावर देखील हे उमेदवार पीटीआयमध्ये सामील होऊ शकणार नाहीत, कारण निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत पक्षांमध्येच सामील होण्याची मुभा आहे.