सज्जनगडावर ‘जय जय रघुवीर समर्थ’चा जयघोष
सातारा :
राष्ट्रसंत श्री समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या आणि त्यांची समाधीस्थळ असलेल्या सज्जनगडावर माघ महिन्यातील गुरू प्रतिपदेपासून सुरू झालेल्या दि. 13 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या दासनवमी महोत्सवाची आज दि. 22 फेब्रुवारी रोजी सांगता झाली असून यात्रेचा आजचा मुख्य दिवस होता. रविवारी सकाळी लळिताचे कीर्तन होऊन या यात्रेचा समारोप होणार आहे.
दरम्यान, गेल्या नऊ दिवसांपासून गडावर रामनामाचा गजर सुरू होता अनेक नामवंतांची कीर्तन, प्रवचन, भजन गायन सेवा गडावर सुरू होती. आज पहाटे दोन वाजता समाधी मंदिरात काकड आरती, यानंतर पहाटे चार वाजता श्री समर्थ समाधी महापूजा, सकाळी साडेसहा वाजता सज्जनगड गावातून सांप्रदायिक भिक्षा असे कार्यक्रम पार पडले. विशेष पूजामध्ये समर्थांची समाधी अनेक सुवासिक गुलाब, चाफा, मोगरा, शेवंती, जास्वंद फुलांनी सुशोभित करण्यात आली होती. तसेच समाधीचे वरील बाजूस मोगऱ्याच्या फुलांच्या माळा लक्ष वेधून घेणाऱ्या होत्या. समर्थ समाधीवरील श्रीराम मूर्तीनाही फुलांची तसेच पुष्पहार याची विशेष सजावट करण्यात आली होती. समाधी मंदिरामध्ये दर्शनासाठी रांगेने समर्थ भक्तांना शिस्तबद्धपणे सोडण्यात येत होते.
सांप्रदायिक भिक्षेमध्ये समर्थ रामदास स्वामींचे वंशज भूषण स्वामी तसेच महंत, मठपती, मानकरी उपस्थित होते. नंतर सकाळी साडेदहा वाजता आरती, छबीना मानाच्या 13 प्रदक्षिणा संपन्न झाल्या यावेळी रामा, रामा हो रामा असे पद म्हणत रामदास स्वामी संस्थान, श्री समर्थ सेवा मंडळाचे पदाधिकारी, मानकरी तसेच हजारो समर्थ भक्त मंदिराला प्रदक्षिणा घालताना एक वेगळाच नजारा पाहायला मिळत होता. दुपारी बारा वाजता श्री समर्थ निर्वाण कथा समर्थ भक्त सुरेशबुवा सोन्ना रामदासी यांनी कथन करताना अनेकांचे डोळे पाणावले होते. समर्थांच्या शेजघरापुढील भव्य मंडपामध्ये ही कथा ऐकताना हजारो समर्थ भक्तांनी गर्दी केली होती. दुपारी साडेबारा पासून संस्था आणि समर्थ सेवा मंडळाच्या वतीने महाप्रसादाच्या आयोजनामध्ये हजारो समर्थ भक्तांनी भात, आमटी तसेच खिरीचा प्रसाद घेऊन तृप्त मनाने गड उतरण्यास सुरुवात केली. रात्री साडेनऊ वाजता समर्थ भक्त राघवेंद्र रामदासी यांची कीर्तन सेवा संपन्न झाली.
श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगडच्या वतीनेही श्रीधर कुटी येथे दैनंदिन उपासना, श्रीधर स्वामींच्या पादुकांना अभिषेक दासबोध पारायण आदी कार्यक्रम करण्यात आले. तसेच भक्तनिवास येथे सुरू असलेल्या श्री समर्थ दासबोध ग्रंथ पारायणाची सांगता करण्यात आली. विद्याधर बुवा वैशंपायन व रसिकाताई यांच्या मार्गदर्शनाखाली हे पारायण गेली नऊ दिवस सुरू होते त्यानंतर मंडळाचे अध्यक्ष ह. भ. प. गुरुनाथमहाराज कोटणीस यांनी दासनवमी या विषयावर सुश्राव्य असे प्रवचन केले. त्यानंतर दुपारी साडेबारा पासून भक्तनिवासात समर्थ भक्तांच्या प्रसादासाठी मोठ्या रांगा लागल्या होत्या.
गडावर येणाऱ्या भाविकांसाठी ज्ञानश्री इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग इथून एसटी महामंडळाच्या वतीने गाड्यांची सोय करण्यात आली होती. खाजगी चार चाकी वाहनांना गडावर येण्यास मनाई करण्यात आली होती ज्ञानेश्वरी परिसरातून बस मार्गे भाविकांना भातखळे येथे सज्जनगड पायरी मार्गापर्यंत सोडण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. बस स्थानक, पायरी मार्ग मुख्य समाधी मंदिर या ठिकाणी पोलीस दल तैनात करण्यात आले होते. परळी तसेच सज्जनगड ग्रामपंचायतीच्या वतीने विशेष जादा पाणीपुरवठा करण्यात आला होता.
मंदिर परिसरात अनिरुद्ध बापू आणि डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने स्वयंसेवक भाविकांच्या रांगांसाठी तैनात करण्यात आले होते. सज्जनगडावर येणाऱ्या सर्व समर्थ भक्तांसाठी महाप्रसादाची सोय करण्यात आली होती. सज्जनगडावर येण्यासाठी सातारा एस. टी. आगारातर्फे विशेष यात्रा स्पेशल गाड्या दर अर्ध्या तासाला सातारा येथून सज्जनगडपर्यंत सोडण्यात आल्या होत्या.
रविवारी या महोत्सवाची सांगता सकाळी लळिताचे कीर्तन आणि होणार आहे, अशी माहिती समर्थ रामदास स्वामी संस्थानचे विश्वस्त भूषण स्वामी, समर्थ सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष योगेश बुवा रामदासी यांनी दिली. उद्या महोत्सवाची सांगता झाली तरी महाशिवरात्रीपर्यंत परिसरातील अनेक गावातील ग्रामस्थ दर्शनासाठी मोठ्या संख्येने येतच असतात.
दरम्यान, श्री समर्थ सेवा मंडळातर्फे सातारा शहरातील समर्थ सदन, सांस्कृतिक केंद्र येथे सुरू असलेल्या ग्रंथराज दासबोध पारायणाची सांगता करण्यात आली. तसेच या ठिकाणी असणाऱ्या श्री समर्थांचे मूर्तीला विशेष अभिषेक व पूजा करून सुशोभित करण्यात आले होते.