Kolhapur News : पाचवडे येथे शॉर्टसर्किटमुळे छकडी आणि गवत गंजी जळून खाक
शॉर्टसर्किटच्या आगीत शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान
मिणचे खुर्द : भुदरगड तालुक्यातील पाचवडे येथे शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास शॉर्टसर्किट होऊन छकडी आणि गवत गंजी जळून खाक झाल्या. यात शेतकऱ्यांचे लाखाचे नुकसान झाले. विद्युत तारा उंच करण्याची शेतकऱ्यांची मागणी होत आहे.
शेतात रचलेल्या गवत गंजी व गवत घेऊन गवताने भरलेली छकडी उभी केली होती. सकाळी अकराच्या सुमारास विद्युत तारांमधून शॉर्ट सर्किट होऊन गवत गंजी, छकहीने पेट घेतला.या आगीत शेतकरी प्रशांत संभाजी देसाई यांची छकडी आणि पांडुरंग मारुती आगम यांचे गवत जळून लाखाचे नुकसान झाले.
ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन कालव्यातील पाण्याने आग आटोक्यात आणली, पण सर्व जळून खाक झाले. तलाठी वर्षा रमेश गुरव, कोतवाल भिकाजी भांदीगरे, सरपंच मनोहर सुतार यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला.