Vari Pandhrichi 2025: काटेवाडीत रंगले मेंढ्यांचे रिंगण
पुणे :
टाळ मृदंगाचा गजर... माउली-तुकोबा नामाचा जयघोष... अशा वातावरणात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे मेंढ्यांचे गोल रिंगण काटेवाडी येथे शुक्रवारी उत्साहात पार पडले. यावेळी पारंपरिक पद्धतीने पालखीच्या स्वागतासाठी धोतराच्या पायघड्या घालण्यात आल्या. हा सोहळा याचि देही याची डोळा साठवण्यासाठी नागरिकांसह वारकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती.
मागच्या शेकडो वर्षांपासून तुकोबांच्या पालखीच्या स्वागताची ही अनोखी परंपरा सुरू आहे. संत गाडगे महाराजांच्या प्रेरणेतून ही परंपरा सुरू झाल्याचे सांगितले जाते. त्यानुसार यंदाही काटेवाडी येथे पालखीचे अतिशय भक्तिभावात व उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले.
तुकोबांच्या पालखीचा गुऊवारी बारामतीत मुक्काम होता. सकाळी पालखी मार्गस्थ झाली आणि वारकऱ्यांना वेध लागले, ते काटेवाडीचे. काटेवाडी आणि वारकऱ्यांचे जीवाभावाचे नाते आहे. अशा या काटेवाडीत रंगला, तो डोळ्यांचे पारणे फेडणारा रिंगणसोहळा. सुऊवातीला तुकोबांच्या पालखीभोवती मेंढ्या धावल्या. त्यांच्यापाठोपाठ पताकावाले, तुळशी वृंदावन आणि कलश डोक्मयावर घेतलेल्या महिला वारकरी, विणेकरी, पखवाजवाले आणि टाळकरी धावले. रिंगण पूर्ण होईपर्यंत अखंड तुकोबा आणि माउलींचा नामघोष सुरू होता. मुख्य मार्गापासून गावातील मैदानावर पालखी नेण्यात आली. येथे परिसरातील नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. वारकऱ्यांनी अल्पोपहार केल्यानंतर सोहळा सणसर मुक्कामी विसावला.