अमित शहांवरील आरोपांना चोख प्रत्युत्तर
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
कॅनडातील दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्या प्रकरणात भारताचे गृहमंत्री अमित शहा यांचा हात आहे, या कॅनडाच्या आरोपाला भारताने चोख प्रत्युत्तर दिले आहे. शहा यांच्यावरील आरोप निखालस खोटे आणि काल्पनिक आहेत, असे भारताने स्पष्ट केले असून कॅनडाच्या सत्ताधारी पक्षाचे नेते स्वत:च्या राजकीय सोयीसाठी भारताला लक्ष्य बनवित असल्याचा प्रत्त्यारोप भारताने केला. विदेशातील खलिस्तानवाद्यांना संपवा, असा आदेश अमित शहा यांनी आपल्या गुप्तचर संस्थांना दिला होता, असा कॅनडाचा आरोप आहे. शहा यांनी सातत्याने खलिस्तानवाद्यांच्या विरोधात आघाडी उघडली आहे. कोणत्याही मार्गाने या खलिस्तानवादी फुटीरांना धडा शिकवा, असे असे शहा यांचे धोरण असल्याचा आरोप कॅनडाने केला आहे. मात्र, याही आरोपाचा कोणताही पुरावा त्या देशाने सादर केलेला नाही. कॅनडाच्या सत्तधारी पक्षाच्या नेत्यांनी काही महिन्यांपूर्वी अमेरिकेच्या वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्राला निज्जर हत्येप्रकरणी माहिती देताना अमित शहा यांच्या नावाचा उल्लेख केला होता. नंतर असा उल्लेख वृत्तपत्रांकडे केल्याचे कॅनडाच्या परराष्ट्र उपमंत्र्यांनी कॅनडाच्या संसदीय समितीसमोर मान्य केले होते. भारताने त्यावेळेलाही शहांविरोधातील आरोपांचा इन्कार केला होता.
प्रत्यक्ष पुरावा नाही
कॅनडाने भारतावर अनेक आरोप केले आहेत. मात्र, या आरोपांचा थेट पुरावा आपल्याकडे नाही. केवळ शक्यतांच्या आधारावर हे आरोप करण्यात आले आहेत, अशी कबुलीही कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांनी काही दिवसांपूर्वी दिलेली होती. भारताने कॅनडाकडे ठोस पुराव्याची मागणी केली आहे. ती त्या देशाने आतापर्यंत पूर्ण केलेली नाही. मात्र, सातत्याने भारतावर आरोप करण्याचे सत्र मात्र सुरु ठेवले आहे. कॅनडाने या प्रकरणात भारताच्या विरोधात अमेरिकेलाही ओढण्याचा प्रयत्न चालविला आहे. भारताने प्रत्येक आरोपाचा सडेतोड इन्कार केला आहे. तरीही प्रत्येकवेळी कॅनडाने नवे आरोप केले आहेत. भारताला लक्ष्य करण्याच्या मागे कॅनडाच्या सत्ताधारी पक्षाचा हेतू राजकीय असून त्या देशातील शीख मतपेटीवर डोळा ठेवून हे आरोप केले जात आहेत, असे तज्ञांचे मत आहे.
अमेरिकेला चिंता
कॅनडाने भारताचे गृहमंत्री अमित शहा यांच्यावर केलेले आरोप ही ‘चिंताजनक’ परिस्थिती आहे, असे प्रतिपादन अमेरिकेने केले आहे. या आरोपांच्या सत्यासत्यतेच्या संदर्भात अमेरिका सातत्याने कॅनडाच्या संपर्कात आहे. अमेरिकेच्या विदेश व्यवहार विभागाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी या संदर्भात अधिक काही बोलण्यास नकार दिला. आम्ही भारताशीही संपर्कात आहोत. कॅनडाच्या आरोपांविषयी आम्हाला चिंता वाटते. आम्ही सर्व संबंधितांच्या संपर्कात आहोत.