रस्ते दुर्घटनांच्या प्रमाणात मोठी वाढ
6 राज्यांमध्ये निम्म्याहून अधिक बळी : योग्य चौकशीद्वारे रस्ते दुर्घटनांचे प्रमाण कमी करता येणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतात रस्ते दुर्घटनांमध्ये जाणाऱ्या बळींचा आकडा चिंताजनक आहे. 2023 मध्ये देशात 1,73,000 लोक रस्ते दुर्घटनांमध्ये स्वत:चा जीव गमावून बसले आहेत. यातील जवळपास 55 टक्के बळी हे केवळ 6 मोठी राज्ये उत्तरप्रदेश, तामिळनाडू, महाराष्ट्र, कर्नाटक, मध्यप्रदेश आणि राजस्थानात गेले आहेत. राजस्थानात रस्ते दुर्घटनांमध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली आहे. तेथे 2022 च्या तुलनेत 2023 मध्ये रस्ते दुर्घटनांमध्ये होणाऱ्या मृत्यूंमध्ये 6 टक्क्यांची वाढ झाली आहे. केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितिन गडकरी यांनी या वाढणाऱ्या आकड्यावर चिंता व्यक्त करत अधिकारी आणि इंजिनियर्सना रस्ते दुर्घटनांची चौकशी करणे आणि सुधारणात्मक पाऊल उचलण्याचा आग्रह केला आहे.
2023 मध्ये संबंधित 6 राज्यांमध्ये 95,246 जणांचा मृत्यू रस्ते दुर्घटनांमध्ये झाला आहे. तर 2022 मध्ये हा आकडा 91,936 राहिला होता. परंतु रस्ते परिवहन मंत्रालय आणि एनसीआरबीकडून अद्याप रस्ते दुर्घटना आणि त्यातील बळींसंबंधी अहवाल प्रकाशित करण्यात आलेला नाही. भारताकडून पुढील 6 वर्षांमध्ये रस्ते दुर्घटनांमध्ये पडणाऱ्या बळींचे प्रमाण निम्म्यावर आणण्याचा प्रयत्न केला जात असतानाही ही समस्या दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे. दुर्घटनांची योग्य चौकशी आणि हस्तक्षेपाद्वारे रस्ते दुर्घटनांमधील जीवितहानी कमी केली जाऊ शकते असे उद्गार एका तज्ञाने काढले आहेत.
चौकशी आवश्यक
मोठ्या राज्यांमध्ये रस्ते आणि वाहने अधिक असल्याने रस्ते दुर्घटनांमधील बळींची संख्याही अधिक असेल या मानसिकतेतून शासकीय अधिकाऱ्यांनी बाहेर पडण्याची गरज आहे. कायदे लागू करण्यासोबत चालकांना प्रशिक्षित करण्यावरही लक्ष केंद्रीत करण्याची आवश्यकता आहे. केवळ 5 किंवा 6 नियम पोलीस लागू करू शकतात. उर्वरित 45 मूलभूत रस्ते नियम लोकांना आणि चालकांना शिकवावे लागतील असे तज्ञांनी निदर्शनास आणून दिले आहे.
मागील वर्षी रस्ते दुर्घटनांमध्ये 1.73 लाख लोकांनी जीव गमावला आहे. दरवर्षी रस्ते दुर्घटनांमध्ये जीव गमावणाऱ्या लोकांपैकी 60 टक्के जण हे 18-34 या वयोगटातील असतात. रस्ते दुर्घटनांचा सामाजिक-आर्थिक खर्च देशाच्या जीडीपीच्या सुमारे 3 टक्के आहे. यामुळे हा मुद्दा गांभीर्याने घेण्याची गरज आहे. रस्ते सुरक्षेच्या मुद्द्यांना संवेदनशीलतेसह हाताळा, दुर्घटनांचा तपास करा, धोकादायक ठिकाणांमध्ये सुधारणा करत ब्लॅकस्पॉट दूर करा असे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी एका रस्ते सुरक्षा विषयक परिषदेला संबोधित करताना म्हटले आहे.