महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

विदेशी पर्यटकांच्या संख्येत कमालीची घट

06:45 AM Dec 17, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

गतवर्षी केवळ 1.7 लाख विदेशींची भेट, कोविडनंतरचे गोव्यातील चित्र, विविध युद्धांचेही परिणाम

Advertisement

प्रतिनिधी/ पणजी

Advertisement

कोविडचे संकट टळल्यानंतर गोव्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या समाधानकारक प्रमाणात वाढली असल्याचे दिसून आले असले तरीही आंतरराष्ट्रीय पर्यटकांनी गोव्याकडे जवळजवळ पाठच फिरविल्याचे त्यातून स्पष्ट झाले आहे.

कोविडनंतर गोव्याने आपले लक्ष आंतरराष्ट्रीय चार्टर्सवरून देशांतर्गत पर्यटकांच्या संख्येकडे वळविले आहे. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने जारी केलेल्या पाच वर्षांच्या अहवालावरून देशी पर्यटकांची संख्या वाढल्याचे तर आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या कमालीची कमी झाल्याचे दिसून आले आहे.

15 लाख लोकसंख्या असलेल्या गोव्यात वर्ष 2018 मध्ये 70.8 लाख देशी पर्यटकांनी भेट दिली, तर 9.3 लाख विदेशी पर्यटकांनी गोव्यात सुट्टी घालवली. वर्ष 2022 मध्ये देशी पर्यटकांची संख्या जवळजवळ समान राहिली तर विदेशी पर्यटकांची संख्या आणखीही रोडावताना केवळ 1.7 लाख एवढीच नोंद झाली आहे.

यासंबंधी अधिक माहिती देताना गोवा ट्रॅव्हल अँड टुरिझम संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याने, वर्ष 2022 मध्ये ब्रिटिश नागरिकांसाठी ई-व्हिसाला विलंब झाल्यामुळे विदेशी पर्यटकांची संख्या कमी राहिल्याचे सांगितले. त्याशिवाय युक्रेन-रशिया युद्ध, तसेच यंदा गाझामधील शत्रुत्वामुळे इस्रायलमधील उड्डाणे आधीच रद्द करण्यात आली आहेत, त्याचाही परिणाम आंतरराष्ट्रीय आगमनावर झाल्याचे सदर पदाधिकाऱ्याने सांगितले.

पुढे बोलताना त्यांनी, आंतरराष्ट्रीय पर्यटकांचे आगमन हळुहळू होत असले तरीही युद्धांमुळे  लोक त्यांच्या देशातून बाहेर पडण्यास संकोच करतात. गोव्यातील किनारे, तुलनेने स्वस्त हॉटेल्स आणि चांगली फ्लाइट कनेक्टिव्हिटी यासारख्या कारणांसाठी ब्रिटिश, जर्मन, स्कॅन्डियाव्हियन, रशियन आणि इस्रायली लोक नेहमीच गोव्याला पसंती देतात. परंतु गेल्या आठ ते दहा वर्षांत फुकेट, कोलंबो, क्वालालंपूर, बाली, तुर्की आणि व्हिएतनाम, आदी देशांनी पर्यटकांना गोव्यापासून दूर नेण्यात बऱ्याच अंशी यश मिळवले आहे, असा दावा केला.

चार वर्षांत 82 टक्के विदेशी पर्यटक घटले

वर्ष 2018 आणि 2022 मधील देशांतर्गत पर्यटकांच्या संख्येतील फरक केवळ 1 टक्का आहे. तर त्याच कालावधीत आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या संख्येत 82 टक्के  घट झाली आहे, असे ते म्हणाले.

थायलंड आणि इंडोनेशिया हे देश व्हिसा ऑन अरायव्हल देतात तर व्हिएतनाम देशात रशियन आणि यूके नागरिकांना व्हिसाशिवाय 15 दिवस राहण्याची परवानगी देण्यात येते. कोविडपूर्वी रशियाकडून रोज पाच चार्टर विमाने गोव्यात येत असत. यंदा रशियातून संपूर्ण आठवड्यात मिळून केवळ सहा विमाने येतात तर युकेमधून केवळ चार विमाने येतात. ही संख्या पाहता कोविड पूर्वीच्या विमान संख्येची भरपाई होणे फारच कठीण आहे, असे त्यांनी सांगितले.

उझबेकिस्तान, कझाकिस्तान यांनी सावरले

त्याही परिस्थितीत उझबेकिस्तान आणि कझाकिस्तानमधून उड्डाणे सुरू झाल्याने 2023च्या आंतरराष्ट्रीय आगमनाची संख्या वाढण्यास मदत झाली आहे. हा परिणाम केवळ गोव्यावरच झालेला नाही तर देशातील प्रत्येक पर्यटन राज्याच्या पर्यटक संख्येवर झाला आहे, हे आकडेवारी पाहिल्यास लक्षात येईल, असे ते म्हणाले. अशा परिस्थितीत कोविड पूर्वीच्या आकडेवारीच्या निम्म्या संख्येलासुद्धा स्पर्श करू शकलो तरीही समाधानकारक राहिल, असे ते म्हणाले.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews
Next Article