For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बीडशेड ते धोंडेवाडी रस्ता अपघातांची मालिका

01:21 PM Jul 04, 2025 IST | Radhika Patil
बीडशेड ते धोंडेवाडी रस्ता अपघातांची मालिका
Advertisement

कसबा बीड / विश्वनाथ मोरे :

Advertisement

करवीर पश्चिम भागातील असणारे पर्यटन क्षेत्र म्हणून महादेव सातेरी मंदिराचा उल्लेख केला जातो. ‘क‘ दर्जा प्राप्त मंदिर, मनमोहक निसर्ग रम्य ठिकाण, सह्यादी डोंगर रांग, टेकडावर देऊळ,डोंगरावर सुंदर गालिचा अंथरला असावी अशी हिरवीगार झाडी, अशा अनेक विविध प्रकारच्या निसर्गाच्या सानिध्यात असणारे महादेव-सातेरी मंदिर आहे. हे मंदिर जागृत देवस्थान असल्याने पर्यटक व भाविकांचा ओघ वाढला आहे.पण बीडशेड ते धोंडेवाडी असणारा रस्ता अपघातांची मालिका बनतोय. याकडे प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक आहे.

  • गणेशवाडी व धोंडेवाडी रस्ता

सातेरी-महादेव डोंगर मार्गावरील धोंडेवाडी घाटात डोंगरमाथ्यावरून वाहून येण्राया उतारावरून वाहून येणाऱ्या पावसाच्या पाण्याच्या प्रवाहामुळे मुख्य रस्त्याच्या उताराकडील बाजूला डोंगराला मोठे घळण पडले आहे. रस्त्याला लागून त्याच्या खालच्या भागात हे घळण असल्यामुळे रस्ता खचण्याचा धोका बळावला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद बांधकाम विभाग व अन्य संबंधित विभागाने याची तात्काळ दखल घेण्याची मागणी या परिसरातील ग्रामस्थ व भाविकांकडून होत आहे.

Advertisement

करवीरच्या पश्चिम भागातील धार्मिक व पर्यटनदृष्ट्या प्रसिद्ध असलेल्या सातेरी - महादेव डोंगरावर वर्षातील दर सोमवारी भाविकांची ये-जा सुरू असते. श्रावण महिन्यात ही संख्या वाढतच असते. शिवाय पर्यटनस्थळ असल्यामुळे पर्यटकांचा ओढा असतो. तसेच या परिसरातील वाड्यावस्तीतील ग्रामस्थांची कायमच रहदारी असते. अशा या मार्गावरील गणेशवाडी तलावाजवळचा घाट रस्ता पार करून धोंडेवाडी घाटात एक छोटा धबधबा आहे. त्याच्या पुढील वळणावरील रस्त्याच्या खालील भागात डोंगरावर मोठे घळण पडले आहे. हे घळण डोंगरमाथ्यावरून वाहत येणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे पडले आहे. पावसाचा जोर वाढेल तसा पाण्याचा प्रवाहही जास्त असतो. रस्त्याच्या डोंगराकडील बाजूचे चर बुजल्यामुळे, काही ठिकाणी चर नसल्यामुळे डोंगरमाथ्यावरून पाणी थेट घाट रस्त्यावर येते आणि रस्त्यावरून खाली पुन्हा खालील डोंगराकडे जाते. त्यामुळे पाण्याच्या या प्रवाहामुळे रस्त्याच्या खालील म्हणजे उताराकडचा डोंगर खचला आहे. मोठे भगदाड पडले आहे.घाटातील रस्ताही खचून जाण्याचा धोका आहे. तसेच या ठिकाणी अपघाताची शक्यता ही नाकारता येणार नाही. रस्ता खचला तर वाड्यावस्त्यांवरील गावांचा वाहतुकीचा मार्ग बंद पडेल.

  • सुरक्षा कठडे, चांगला रस्ता आवश्यक

महादेव सातेरी मंदिर हे ‘क ‘ दर्जा असलेले पर्यटन क्षेत्र झाले आहे. बीडशेड ते धोंडेवाडी हा रस्ता खूपच खराब झाला आहे. गणेशवाडी ते धोंडेवाडी घाट रस्ता असल्याने अनेक छोटे मोठे अपघात घडतात. यासाठी सुरक्षा कठडे व चांगला रस्ता हे गरजेचे झाले आहे.तसेच बहिरेश्वर म्हसोबा मंदिर व श्री कृष्ण मंदिर ते गणेशवाडी 5 ते 7 पाच गावांना जोडणारा रस्ता अनेक वर्षे प्रलंबितच आहे.
                                                                                                       -दादासो लाड,संचालक, कुंभी साखर कारखाना

  • अरुंद रस्त्याचे रुंदीकरण आवश्यक

भाविकांचे श्रध्दास्थान महादेव - सातेरी मंदिर आहे. मंदिराकडे जाताना लागणारे तलाव, नागमोडी वळणे, वनराई यामुळे पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. सध्याचा असणारा अरुंद रस्ता यांचे रुंदीकरण करणे काळाची गरज आहे. डोंगररांग व पडणारा पाऊस यामुळे रस्ता खराब झाला आहे. त्यामुळे रस्ता बळकटीकरण करणे आवश्यक आहे.

  • पर्यायी रस्ता व मंदिराकडे दुर्लक्ष

महादेव सातेरी मंदिर भाविकांचे व पंचक्रोशीतील हजारो लोक दर्शनासाठी येत असतात. पण हद्दवाढीमुळे असणारे हे मंदिर आमशी, केकतवाडी, मल्लेवाडी, या आजूबाजूच्या परिसरातील कोणत्या गावात येत आहे, हे गुलदस्त्यातच आहे. त्यामुळे श्रेयवाद निर्माण होऊन पर्यायी रस्ता व मंदिर याकडे दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास येत आहे. भेदभाव वं श्रेयवाद न करता या भागाचा विकास होणे आवश्यक आहे.

Advertisement
Tags :

.