ज्येष्ठ उद्योजकाला सायबर गुन्हेगारांनी ठकविले
8.3 कोटी रुपयांचा गंडा : शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाने फसवणूक
बेंगळूर : दोन दिवसांपूर्वी बेंगळूरमध्ये वृद्धाला सायबर गुन्हेगारांनी ठकविले होते. ही घटना ताजी असतानाच आणखी एक प्रकरण उघडकीस आले आहे. ज्येष्ठ उद्योजक राजेंद्र नायडू (वय 84) यांची सायबर गुन्हेगारांनी 8.3 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. भामट्यांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या उद्देशाने राजेंद्र यांच्याकडून पैसे उकळले. यातून मिळालेला नफा धार्मिक कार्यासाठी दान करण्याचा संकल्प केला होता. रामभक्त असणारे राजेंद्र यांनी अयोध्येतील राम मंदिरासाठी चांदीचे पूजासाहित्य देणगी स्वरुपात दिले होते. सायबर गुन्हेगारांनी राजेंद्र यांना आरएआरसीएलएलपीआरओ नामक अॅप इन्टॉल करण्यास सांगितले. अॅपद्वारे गुंतवणुकीबाबतचा तपशिल समजावून दिला. सुरुवातीला विश्वास बसल्याने राजेंद्र यांनी आरटीजीएसमार्फत 25 लाख रुपये ट्रान्स्फर केले होते. अॅपद्वारे केलेली गुंतवणूक यशस्वी झाल्याचे दाखविल्यानंतर त्यांनी टप्प्याटप्प्याने 83 कोटी रु. पाठविले. अॅपमध्ये या रकमेला 59.4 कोटी रु. लाभांश मिळाल्याचे दाखविण्यात आले. यातील 15 कोटी रु. काढण्याचा प्रयत्न केला असता ते शक्य झाले नाही. त्यामुळे फसवणूक झाल्याचे समजताच त्यांनी 1930 हेल्पलाईनवर फोन करून तक्रार दाखल केली.