For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एक अन्नस्वयंपूर्ण देश

06:11 AM Jan 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
एक अन्नस्वयंपूर्ण देश
Advertisement

आज जगातील प्रत्येक देश अन्नधान्यांसाठी अन्य देशांवर अवलंबून आहे. तथापि, एक अपवादात्मक देश असा आहे, की जो त्याची अन्नाची आवश्यकता संपूर्णत: त्याच्याच भूमीतून भागवित आहे. या देशाला जगातील इतर कोणत्याही देशाकडून कोणताही अन्नपदार्थ आयात करावा लागत नाही. अशा प्रकारे अन्नाच्या संदर्भात संपूर्ण स्वयंपूर्तता प्राप्त केलेला तो एकमेव देश मानला जातो.

Advertisement

या देशाचे नाव गुयाना असे असून तो दक्षिण अमेरिकेत आहे. हा देश धान्ये, भाज्या, तेलबिया, फळे, इतकेच नव्हे, तर मसाल्याचे पदार्थही आपल्या देशातच प्राप्त करतो. हा देश खरी कृषीक्रांती अनुभवत आहे, असे त्याच्यासंबंधी म्हटले जाते. 2025 मध्ये ‘नेचर फूड जर्नल’ नामक जागतिक प्रसिद्धीच्या नियतकालिकाने या देशाचा अभ्यास करण्यासाठी तेथे आपले प्रतिनिधी पाठविले होते. हा देश 100 टक्के अन्नस्वयंपूर्ण असल्याचे या प्रतिनिधींना आढळले. त्यांनी तसा अहवालही आपल्या संस्थेला सादर केला आहे. हा देश त्याला आवश्यक असणारी सर्वप्रकारची अन्नधान्ये, भाज्या, फळे इतकेच नव्हे, तर मासे, मांस, मध, साखर, मसाल्याचे पदार्थ, इतर प्रकारचे सागरी अन्न, सुकामेवा, तेलबिया आदी सर्व अन्नपदार्थ स्वत:च्या देशातच त्याच्या लोकसंख्येला पुरेसे ठरतील अशा प्रमाणात निर्माण करतो. या देशाला इतर कोणत्याही देशाकडे अन्नपदार्थांसाठी याचना करावी लागत नाही. तसेच तो कोणत्याही प्रकारचे अन्नपदार्थ आयात करत नाही. या देशाची लोकसंख्या 9 लाख आहे. केवळ एवढेच या देशाचे वैशिष्ट्या आहे असे नाही. या देशाने आपल्या आपल्या वनांपैकी 85 टक्के वने सुरक्षित राखली आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात नैसर्गिक वनप्रदेश सुरक्षित ठेवणारा आणि वनांचे संवर्धन करणारा जगातील एकमेव देश, अशीही ख्याती या देशाने प्राप्त केली आहे. या देशात सुपिक भूमी मोठ्या प्रमाणात आहे. वनांचे संरक्षण केल्याने पिकावू भूमीची धूप फारशी होत नाही. तसेच पाऊसपाणी वेळच्यावेळी होत असल्याने कृषी  उत्पादनही मोठे आहे. पर्यावरण संरक्षण आणि अन्नस्वयंपूर्णता यामुळे हा देश अन्य कोणत्याही देशांना आदर्श ठरावा असा आहे, असे तज्ञांचे म्हणणे आहे. अनेक दशकांपासून या देशाने कृषीक्षेत्रात मोठी गुंतवणूक केली असून त्यामुळे तो आज अन्नाच्या संदर्भात पूर्णत: स्वावलंबी झाल्याने जगाच्या प्रशंसेचा विषय बनला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.