स्वाभिमानी देश दबावात घेत नाही निर्णय
रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांचे वक्तव्य : भारताशी आहे कनेक्शन
वृत्तसंस्था/ मॉस्को
अमेरिकेने रशियाच्या दोन सर्वात मोठ्या तेल कंपन्या रोसनेफ्ट आणि लुकोइलवर निर्बंध लादले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयांना रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांना दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न संबोधित रशिया बहिर्गत मागण्यांसमोर झुकणार नसल्याची भूमिका मांडली आहे. कुठलाही स्वाभिमानी देश दबाबात येत कधीच झुकत नसल्याचे पुतीन यांनी म्हटले. अमेरिकेकडून रशियन तेल कंपन्यांवर निर्बंध लादण्यात आल्यावर आता भारतावर रशियाच्या नजरा लागून राहिल्या आहेत. या निर्बंधांमुळे आता रशियन कच्चे तेल खरेदी करणे भारतासाठी सोपे ठरणार नाही. भारताच्या तेल कंपन्या रोसनेफ्ट आणि ल्युकोइल या रशियन कंपन्यांकडूनच सर्वाधिक कच्चे तेल खरेदी करत होत्या. चीननंतर भारताने देखील रशियन कच्चे तेल खरेदी करणे कमी केल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. अमेरिकेच्या निर्बंधांपासून वाचण्यासाठी भारत रशियन कच्च्या तेलाची खरेदी कमी करू शकतो असा दावा जागतिक प्रसारमाध्यमांकडून करण्यात येत आहे.
युद्धविरामाची सूचना
अमेरिका आणि युरोपीय सहकाऱ्यांनी वारंवार रशियाला युद्धविराम करण्याची सूचना केली आहे. तसेच या देशांनी रशियावर अनेक प्रकारचे कठोर निर्बंध लादले आहेत. तर पाश्चिमात्यांचे निर्बंध आणि युक्रेनला शस्त्रास्त्रांच्या पुरवठ्याच्या माध्यमातून रशियाच्या सार्वभौमत्वाला कमी लेखण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप पुतीन यांनी केला आहे. तर दुसरीकडे हे निर्बंध रशियाच्या आक्रमकतेला वित्तपोषित करण्याची क्षमता मर्यादित करण्याच्या प्रयत्नांचा हिस्सा असल्याचा दावा अमेरिकेच्या अर्थ विभागाने केला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांना इशारा
अमेरिकेचे हे निर्बंध जागतिक ऊर्जा बाजारांना अस्थिर करू शकतात आणि किमतींमध्ये वृद्धी करू शकतात, असा इशारा मी अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांना दिला होता. निर्बंधांचा प्रभाव अमेरिकेसह कच्च्या तेलाच्या जागतिक किमतीवर पडणार असल्याचे पुतीन यांनी म्हटले आहे. युक्रेन युद्धासंबंधी अद्याप शांतता करार न झाल्याने ट्रम्प आता अस्वस्थ झाले असल्याचे मानले जात आहे. ट्रम्प यांनी युक्रेन युद्ध संपविण्यावरून रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांची अलास्का येथे भेट घेतली होती, परंतु यातून कुठलीच फलनिष्पत्ती होऊ शकली नव्हती.