आत्मज्ञानी मनुष्य नेहमी तृप्त असतो
अध्याय चौथा
भगवंत म्हणाले, जो कर्म करत असताना, चुकून आपण अकर्म करत नाहीना ह्याबद्दल दक्ष असतो किंवा अकर्माचे आचरण हातून घडू लागल्यावर सावध होऊन जो कर्म करू लागतो, तो बुद्धिमान होय. योगी ह्याप्रमाणे योग्य कर्मे करून कृतकृत्य होतो. सर्व इच्छा, संकल्प सोडून जो कर्मे करतो त्याला आत्मज्ञान प्राप्त झालेले असल्याने त्याची कर्मे आत्मज्ञानाच्या प्रभावाने जळून जातात. त्याला पंडित म्हणून मान्यता मिळते.
ह्या अर्थाचा उद्योग करितो सारे काम-संकल्प सोडुनी । ज्ञानाने जाळिली कर्मे म्हणती त्यास पंडित ।। 19 ।।
हा श्लोक आपण पहात आहोत. त्यानुसार ज्याने कधी कर्तव्यकर्मे करण्याचा कंटाळा केलेला नाही, ज्याला कधीही फळाची इच्छा होत नाही, अमुक एक कर्म मी करीन किंवा सुरु केलेले कर्म मी पूर्ण करीन असे काहीही मनात येत नाही त्या माणसाच्या रुपात प्रत्यक्ष ब्रह्मच वावरत आहे असे तू समज.
ह्यावर थोडे स्पष्टीकरण असे की, माणसाला त्याच्या पूर्वकर्मानुसार सध्याच्या जीवनातले सुखदु?खांचे भोग वाट्याला येत असतात. पूर्वी केलेल्या कर्मापैकी ज्या कर्माचे फळ मिळण्याची वेळ झालेली असते ती फळे तो सध्याच्या जन्मात भोगत असतो परंतु पूर्वीच्या ज्या कर्माची फळे मिळण्याची वेळ अजून झालेली नसते ती सर्व कर्मे मात्र त्याला प्राप्त झालेल्या आत्मज्ञानाच्या धगिने जळून जातात. त्यामुळे ह्या जन्मी वाट्याला आलेले भोग भोगले की, त्याचे प्रारब्ध संपून जाते. तसेच तो ह्या जन्मी जे कर्म करत असेल त्यातून त्याला फळाची अपेक्षा नसल्याने त्याच्या खात्यावर नवीन पाप, पुण्य जमा होत नसल्याने त्याचा उपभोग घेण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही म्हणून सध्याचा जन्म संपला की, जन्ममृत्युच्या चक्रातून त्याची सुटका होऊन तो परब्रह्मात विलीन होतो.
पुढील श्लोकात भगवंत म्हणतात, अशा माणसाला कोणतीच फलवासना नसल्याने तो नेहमीच तृप्त असतो. तो जरी कर्मात गढून गेलेला असला तरी आपण काही करतोय अशी त्याला जाणीव होत नाही.
नित्य-तृप्त निराधार न राखे फल-वासना । गेला गढूनि कर्मात तरी काही करी चि ना ।। 20 ।।
श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, तो शरीराविषयी उदास आणि फळाबद्दल निरिच्छ असल्याने कायम आनंदात असतो. अर्जुना, तो संतोषाच्या गाभार्यात जेवत असल्याने आत्मबोधाच्या पक्वान्नाला पुरे असे कधी म्हणतच नाही. त्याला आपण कर्म करत आहोत असे दिसत असले तरी ते ईश्वर आपल्याकडून करवून घेत आहे हे लक्षात घेऊन तो स्वत:ला कर्ता मानत नाही.
येथे भावल्यांच्या खेळाचे उदाहरण ध्यानात घेऊ. आपल्याला दिसताना खेळातल्या भावल्या इकडेतिकडे फिरताहेत असे दिसते पण त्या स्वत:च्या मनाने फिरत नसून त्यांच्यामागे अदृश्य असलेला सूत्रधार त्यांना हलवत असतो. भावल्या निर्जीव असल्याने त्या विनातक्रार सूत्रधार नाचवेल तसे नाचत असतात. त्याप्रमाणे आपला सूत्रधार असलेला ईश्वर आपल्याकडून कामे करून घेत असतो. ही वस्तुस्थिती स्वीकारणारा साधक वरून सामान्य मनुष्यासारखा दिसतो परंतु आतून परब्रम्हाशी एकरूप झालेला असतो अशा माणसाला कोणतीच फलवासना नसल्याने तो नेहमीच तृप्त असतो. तो जरी कर्मात गढून गेलेला असला तरी आपण काही करतोय अशी जाणीव त्याला होत नाही. त्याने सर्व इच्छांचा त्याग केलेला असल्याने केलेल्या कर्माचा दोष त्याला लागत नाही. जे मिळेल त्यात तो संतुष्ट असल्याने त्याला कुणाविषयी मत्सर वाटत नाही. कर्माचे फल मिळो अथवा न मिळो त्याला सर्व सारखेच असते.
क्रमश: