नऊ सहस्र वर्षांपूर्वीचे रहस्य
आफ्रिकेतील देश मालावी येथे नुकतेच एक पुरातत्वीय उत्खनन करण्यात आले आहे. या उत्खननाचे निष्कर्ष अत्यंत अद्भूत आणि आश्चर्यकारक आहेत, असे पुरातत्व संशोधकांचे मत आहे. या उत्खननामुळे आजवरच्या अनेक समजुतींना तडा जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मालावीच्या उत्तर भागातील डोंगराळ भागांमध्ये हे उत्खनन करण्यात आले. या उत्खननात 9 सहस्र वर्षांपूर्वी पुरण्यात आलेल्या अतिशय लहान बांध्याच्या महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. हे स्थान आजवर शोधल्या गेलेल्या मृतदेह अंत्यसंस्कार स्थानांमधील सर्वात प्राचीन असल्याचा निर्वाळा संशोधकांनी दिला आहे. ही महिला ‘हंटर गॅदरर्स’ प्रकारच्या मानव प्रजातीची असून या प्रजातीत अशा प्रकारे पुरण्याची जटील परंपरा नव्हती, असा आजवर समज होता. पण या संशोधनाने तो चुकीचा ठरत आहे.
येल विद्यापीठाच्या पुरातत्व संशोधक जेसिका थॉम्पसन आणि त्यांचे सहकारी यांनी हा मृतदेह शोधला आहे. या स्थानाचा शोध 75 वर्षांपूर्वीच लागला होता. तेथे अनेकदा उत्खननही करण्यात आले आहे. तथापि, इतका जुना मृतदेह सापडण्याचा हा प्रथमच प्रसंग आहे. हे स्थान इसवीसन पूर्व 6 हजार वर्षे ते 14 हजार वर्षे एक स्मशानभूमी म्हणून उपयोगात आणली जात होती. येथे सापडलेल्या मृतदेहांपैकी बहुतेक पुरलेल्या स्थितीत होते. तथापि, हा महिलेचा मृतदेह मात्र दहन केलेल्या स्थितीत आहे. तो राखेच्या एका ढिगाऱ्याप्रमाणे दिसून असून त्यावेळी मृत महिलेचे दहन केल्याची स्पष्ट चिन्हे या संशोधनात आढळली आहेत. या राखेच्या ढिगात या साधारणत: साडेचार फूट उंचीच्या महिलेच्या अस्थी सापडल्या आहेत. यावरुन, त्या काळातही मृतदेहांचे दहन केले जात होते, हे सिद्ध होत आहे. दहन संस्कार हे त्यामानाने नव्या काळात विकसीत झाले आहेत, अशी आजवर समजूत होती. तिला या संशोधनाने मोठाच धक्का बसला आहे. मृतदेहाचे दहन करण्यासाठी जी चिता रचण्यात आली होती, तशा प्रकारची रचना करणे त्यावेळी मानवासाठी अतिशय किचकट होते