For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अयोध्येत लोटला जनसागर

06:58 AM Jan 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
अयोध्येत लोटला जनसागर
Advertisement

रामनगरीत भक्तीचा महापूर : मोठ्या संख्येत भाविक आल्याने गोंधळ : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तातडीने दाखल

Advertisement

वृत्तसंस्था/ अयोध्या

अयोध्येम रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर मंगळवारी मंदिरात सर्वसामान्यांसाठी दर्शन सुरू झाले आहे. पहाटे 3 वाजल्यापासूनच अयोध्येत दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली. रामलल्लाच्या दर्शनासाठी अनेक राज्यांमधून भाविक हजारोंच्या संख्येत आले आहेत. मंदिराचे द्वार खुले होताच लोकांमध्ये आत शिरण्यासाठी चढाओढ दिसून आली. भाविकांची मोठी गर्दी पाहता दुपारी  बंद करण्यात आलेले भगवान रामलल्लाचे गर्भगृह एक तास अगोदरच दर्शनासाठी खुले करण्यात आले. मंगळवारी दुपारपर्यंतच अडीच लाखाहून अधिक लोकांनी दर्शन घेतले होते. गर्दीला नियंत्रित करण्यासाठी 8 न्यायदंडाधिकाऱ्यांना तैनात करावे लागले. तर दुसरीकडे राम मंदिराच्या गर्भगृहात स्थापित नव्या मूर्तीला ‘बालक राम’ हे नाव देण्यात आले आहे.

Advertisement

राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेल्या श्रीरामलल्लाच्या नव्या मूर्तीला बालक राम या नावाने ओळखले जाणार आहे. मूर्तीचे स्वरुप एका बालकाप्रमाणे असल्याने हे नाव देण्यात आल्याची माहिती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सामील पुजारी अरुण दीक्षित यांनी दिली आहे. अरुण दीक्षित हे वाराणसीच्या विश्वनाथ मंदिराचे देखील पुजारी आहेत.

योगी आदित्यनाथ अयोध्येत दाखल

अयोध्येत भाविकांची झालेली अलोट गर्दी पाहता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रामनगरीत धाव घेतली आहे. याचदरम्यान प्रशासनाने भाविकांना त्वरित अयोध्येत न येण्याचे आवाहन केले आहे. 10-15 दिवसांनी अयोध्येत येत आरामात दर्शन करा असे प्रशासनाने म्हटले आहे. अयोध्येम रामलल्लाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केल्याने स्थिती नियंत्रित करण्यासाठी उत्तरप्रदेश सरकारचे मुख्य सचिव (गृह) संजय प्रसाद आणि पोलीस महासंचालक प्रशांत कुमार हे रामनगरीत पोहोचले आहेत.

तपासणी केंद्रं नसल्याने असुविधा

भाविकांच्या सुविधा केंद्रात चेकिंग काउंटर्स अद्याप निर्माण करण्यात आलेले नाहीत. यामुळे अनेक ठिकाणी तपासणी नाके तयार करत पोलीस भाविकांच्या सामग्रीची तपासणी करत आहेत. बहुतांश लोकांकडून आणले गेलेल्या बॅग्सची तपासणी केली जात आहे. बॅगमधील सर्व सामग्रीची तपासणी मोठ्या गर्दीमुळे अशक्य ठरली आहे यामुळे भाविक मोबाइल मंदिरात नेत सेल्फी काढत आहेत. यामुळे मंदिरात अधिक वेळ भाविक थांबत असल्याने गर्दीवर नियंत्रण करणे अवघड ठरल्याचे मानले जात आहे. मंदिर उभारणीनंतर दरदिनी 1 लाख भाविक येतील अशी ट्रस्टची अपेक्षा होती. परंतु पहिल्याच दिवशी 5 लाखाहून अधिक भाविक पोहोचल्याने व्यवस्था अपुरी पडली आहे. भाविकांसाठी सध्या केवळ 6 हजार लॉकरच तयार झाले आहेत.

पोलिसांकडून आवाहन

देशवासीयांचे तब्बल 500 वर्षांचे स्वप्न सोमवारी पूर्ण झाले आणि रामलल्ला अयोध्येतील मंदिरात विराजमान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते श्रीराम मंदिरात रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेल्या दिग्गजांनी सोमवारीच दर्शन घेतले. त्यानंतर आता हे मंदिर सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले आहे. मंगळवारी पहाटेपासूनच रामभक्तांनी मंदिरात दर्शनासाठी गर्दी करण्यास सुरुवात केली. अयोध्येत मोठ्या संख्येत रामभक्त पोहोचल्याने पोलिसांनी भाविकांनी अयोध्येत सध्या येऊ नये असे आवाहन केले आहे.

बाराबंकी येथील पोलिसांनी अयोध्येत येणाऱ्या भाविकांना काही वेळ थांबा अशी विनंती केली आहे. अयोध्येत लोटलेला जनसागर पाहून पोलिसांनी अनेक ठिकाणी वाहतूक वळविली आहे. मंगळवारी सकाळी पोलिसांनी बॅरिकेड्स हटविल्यावर भक्तांनी मंदिराच्या दिशेने धाव घेतली. त्यानंतर गर्दी प्रचंड वाढल्याने पोलिसांनी मर्यादित संख्येत आणि टप्प्याटप्यात भाविकांना मंदिर परिसरात सोडण्याचा निर्णय घेतला. गर्दी नियंत्रित करण्यासाठी अधिक पोलीस कुमक अयोध्येत बोलवावी लागली आहे.

योगी आदित्यनाथांनी घेतला आढावा

रामनगरी अयोध्येत भाविकांचा महासागर पाहून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी हवाई पाहणी केली आहे. यानंतर ते राम मंदिरात पोहोचले, यादरम्यान योगींनी राम मंदिरातील व्यवस्थांचा आढावा घेतला आहे. यावेळी त्यांच्यासाब्sात प्रमुख सचिव संजय प्रसाद आणि विशेष पोलीस महासंचालक प्रशांत कुमार होते.

8 हजारांहून अधिक जवान तैनात

अयोध्येत राम जन्मभूमी मंदिरात रामलल्लाच्या दर्शनासाठी लाखो भाविक पोहोचले आहेत. यामुळे स्थानिक प्रशासनाला मोठी कसरत करावी लागत आहे. भाविकांना सुरळीतपणे दर्शन मिळावे म्हणून 8 हजारांहून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

भाजप अध्यक्षांचा दौरा रद्द

भाजप अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा हे बुधवारी अयोध्येत दाखल होणार होते, परंतु अयोध्येतील गर्दी पाहता त्यांचा हा दौरा रद्द झाला आहे. भाजपचा कुठलाही वरिष्ठ नेता आगामी काही दिवसांपर्यंत अयोध्येत दर्शनासाठी पोहोचणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.

Advertisement
Tags :

.