गणपतीपुळे मंदिरात भाविकांचा जनसागर
रत्नागिरी :
पवित्र श्रावण महिन्यात अंगारकी चतुर्थीचा दुर्मीळ योग आल्याने रत्नागिरीतील प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरात मंगळवारी भाविकांची प्रचंड गर्दी उसळली. श्रावण महिन्यातील या विशेष योगामुळे भाविकांसाठी हे दुहेरी पर्वणी ठरली आहे. घाटमाथ्यासह महाराष्ट्राच्या विविध भागांतून हजारो भाविकांनी गणपतीपुळे येथे हजेरी लावली.

मंगळवारी पहाटेपासूनच श्रींच्या दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दिवसभर दर्शनासाठी गर्दी कायम होती. मंदिर समितीने दिलेल्या अंदाजानुसार, दिवसभरात सुमारे 30 ते 40 हजार भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. भाविकांना सहज दर्शन घेता यावे, यासाठी मंगळवारी रात्री 10.30 वाजेपर्यंत मंदिर खुले ठेवण्यात आले.

- दर्शनासाठी मोठा उत्साह
या गर्दीच्या पार्श्वभूमीवर भाविकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी मंदिर समिती आणि स्थानिक प्रशासन पूर्णपणे सज्ज होते. सुरक्षित व सुलभ दर्शनासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या. या विशेष दिवशी गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांमध्ये मोठा उत्साह पहायला मिळाला.