राज्यातील पोलिसांनाच 1100 कोटींचा गंडा
सांगली :
महाराष्ट्रातील सात हजारहून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांची एका बिल्डरकडून फसवणूक करण्यात आली आहे. त्याने पुणे लोहगाव येथे महाराष्ट्र पोलीस मेगासिटी निर्माण करण्याच्या नावाखाली 1100 कोटी रूपये या पोलिसांकडून उकळले. पण त्याठिकाणी बांधकामही केले नाही. त्यामुळे फसवणूक झालेल्या सात हजार पोलीस कर्मचाऱ्यांनी आता बांधकाम क्षेत्रावर नियंत्रण करणाऱ्या रेरा कार्यालयासमोर दहा मार्च रोजी उपोषणाचा निर्णय घेतला आहे.
याप्रकरणी शासनाकडून तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: दुर्लक्ष केल्याची तक्रार या फसलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या एमपीएमसी बचाओ कृती समितीच्या सदस्यांनी पत्रकार बैठकीत केली आहे.
याबाबत माहिती अशी, पुणे लोहगाव येथे महाराष्ट्र पोलीस मेगासिटी नावाने सहकारी गृहनिर्माण प्रकल्प सुरू करण्याचे परिपत्रक 25 सप्टेंबर 2009 साली पुणे पोलीस आयुक्तांनी काढले.
त्यानुसार याठिकाणी पोलिसांनी मोठ्याप्रमाणात पैसे गुंतविले आणि हे काम बी.ई बिलीमोरिया कंपनीला मिळाले. या कंपनीने मोठयाप्रमाणात जागा खरेदी केली. तसेच याठिकाणी भव्य प्रकल्प उभा करणार असे आश्वासन देत या सर्व सात हजार सभासदांकडून लाखो रूपये घेतले पण प्रत्यक्षात जागेवर बांधकाम केले नाही. त्यामुळे या सभासदांनी तत्काळ याबाबत सहकार विभागाकडे माहिती मागवली.
त्यानंतर सहकार विभागाने बिल्डरला साजेसे उत्तर देत यामध्ये हात वर केले. याबाबत आमदार श्वेता महाले आणि आमदार टिंगरे यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडून हा प्रश्न विधीमंडळात आणला आणि शासनाला यामध्ये मध्यस्थी करण्याची विनंती केली पण शासनानेही याकडे दुर्लक्ष केले असल्याचे दिसून आल्यावर आता या सर्व सभासदांनी या प्रश्नी आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.
पोलीस असणाऱ्या सभासदांनाच शासनाकडून दुर्लक्षित केले गेल्याने सामान्य नागरिकांना शासन काय दाद देणार असा सवालही बचाव कृती समितीच्या सदस्यांनी या पत्रकार बैठकीत विचारला. तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नात लक्ष घालून तत्काळ यावर निर्णय घ्यावा, अशी मागणीही करण्यात आली. याशिवाय याप्रकरणी बांधकामावर नियंत्रण ठेवणाऱ्या रेरा कार्यालयावर उपोषण करण्यात येणार असून त्यानंतर या आंदोलनाची तीव्रता वाढविली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी प्रसाद जामदार, बापूसाहेब उथळे, बळवंतराव पाटील यांच्यासह अनेक सभासद उपस्थित होते.
- कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्यांचीच फसवणूक
पोलीस कायद्याची कडक अंमलबजावणी करतात. पण अंमलबजावणी करणाऱ्या सात हजार पोलिसांची एका बिल्डरने हातोहात फसवणूक केली. त्यामुळे सामान्य नागरिकांना बिल्डर कसा फसवत असेल, असा सवालही या बचाव कृती समितीच्या सदस्यांनी यावेळी उपस्थित केला.