For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लाखाचा पगार... प्रत्यक्षात लुटण्याचा रोजगार

10:53 AM Jan 10, 2026 IST | Tarun Bharat Portal
लाखाचा पगार    प्रत्यक्षात लुटण्याचा रोजगार
Advertisement

बेळगावातील तरुणांना कंबोडियात आला धक्कादायक अनुभव : कसेबसे गाठले बेळगाव

Advertisement

बेळगाव : सायबर गुन्हेगारांचे कारनामे सुरूच आहेत. बेळगाव शहर-जिल्ह्यासह राज्यातील वेगवेगळ्या शहरातील सावजांना सहजपणे लाखो रुपयांना गंडविण्यात येत आहे. सध्या कंबोडियामधील जकार्ता हे सायबर गुन्हेगारांची राजधानी असून पाच हजारहून अधिक भारतीय तरुण तेथील कॉल सेंटरमध्ये काम करीत आहेत. आपल्याच देशातील नागरिकांना ते ठकवत आहेत. या विषवर्तुळात न अडकता बेळगाव येथील दोन तरुणांनी कंबोडिया येथील नोकरी अर्ध्यावर सोडून बेळगाव गाठले आहे.

परदेशात नोकरी केल्यास चार पैसे अधिक मिळतात. सुंदर घर बांधता येते. लग्न करता येते. आई-वडिलांसह कुटुंबीयांचा सांभाळ करता येतो, या आशा बाळगून परदेशी नोकरीसाठी गेलेल्या दोन तरुणांना कंबोडियात अतिशय वाईट अनुभव आला आहे. आपल्याच देशवासियांना ठकवायची नोकरी आम्ही करणार नाही, असे ठणकावून सांगत या दोन्ही तरुणांनी बेळगाव गाठले आहे. बेळगाव ते कंबोडिया व पुन्हा बेळगावपर्यंतचा त्यांचा प्रवास थक्क करणारा असून बेळगाव येथील अनेक तरुण कंबोडियातील कॉल सेंटरमध्ये अडकल्याचीही माहिती मिळाली आहे.

Advertisement

भाग्यनगर येथील प्रशांत कोले, नागुर्डा, ता. खानापूर येथील केशव नांदूरकर या दोन तरुणांना आपल्या मित्रांकरवी माहिती मिळाली. कंबोडियात डाटा एंट्री कॉम्प्युटर ऑपरेटरची नोकरी आहे. दरमहा एक लाखाचा पगार मिळतो. कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी रॉबी व जॉन (हे दोघे मूळचे पंजाबचे, सध्या कंबोडियात आहेत) हे एजंट आहेत, असे सांगितले. मित्राच्या सांगण्यावर विश्वास ठेवून प्रशांत व केशव या तरुणांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता करून 28 डिसेंबर 2025 रोजी कंबोडिया गाठले.

पेनमपेह विमानतळावर उतरल्यानंतर बेळगाव येथील तीन तरुणांसाठी कंपनीने कार पाठवली. कंपनीच्या कारमधून हे दोघेही कंपनीच्या इमारतीपर्यंत पोहोचले. तेथे पोहोचल्यानंतर डाटा एंट्री म्हणजे नेमके काय करायचे? असा प्रश्न या तरुणांनी विचारला. कंपनी चालविणारे चिनी आहेत. चिनी व्यवस्थापनाने कामाचे खरे स्वरूप सांगितले. फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्रामच्या व डेटिंग अॅपच्या माध्यमातून भारतीयांना गळ टाकायचे आहेत, फिशिंग करायचे आहे, असे सांगण्यात आले.

काहीतरी मोठ्या कंपनीतील काम असणार, लाख रुपये पगार मिळणार, या आशेने कंबोडिया गाठलेल्या तरुणांना धक्काच बसला. आम्ही कोणाला फसविणार नाही. जर पोलिसांनी छापा टाकला, आम्ही पकडलो गेलो तर याला कोण जबाबदार? असा प्रश्न त्या तरुणांनी व्यवस्थापनाला विचारला. तुम्ही कामासाठी आला आहात की भारतीय एजंट आहात? तुम्हाला करायचे आहे तर कॉन्ट्रॅक्ट सही करा नाहीतर चालते व्हा, असे त्यांना सुनावण्यात आले.

कंपनीच्या कामकाजावर संशय व्यक्त केल्यामुळे हाकलून लावले

या तरुणांनी कंपनीच्या कामकाजावर संशय व्यक्त केल्यामुळे त्यांना तेथून हाकलण्यात आले. बेळगाव येथून गेलेला आणखी एक तरुण सुजय याने कंपनीच्या कॉन्ट्रॅक्टवर सही केली. तो तेथेच राहिला. प्रशांत व केशव यांनी मात्र कसेबसे बेळगाव गाठले. कसेबसे एक-दोन रात्र भाड्याच्या खोलीत घालवून हे तरुण 30 डिसेंबरला बेळगावला परतले. कॉन्ट्रॅक्टवर सही करणाऱ्या बेळगावच्या तरुणानेही मला कसे तरी बोलावून घ्या, असे तो या परतलेल्या तरुणांना मेसेज करत आहे. या दोन्ही तरुणांचा कंबोडियातील अनुभव थक्क करणारा असून दोन दहा मजली इमारतीत मोठ्या प्रमाणात फिशिंग चालते. पाच हजारहून अधिक भारतीय तरुण कंबोडियातील कॉल सेंटरमध्ये कार्यरत असल्याची माहितीही या तरुणांनी ‘तरुण भारत’ला दिली.

अनेक भारतीय तरुण मनात नसतानाही तेथे पडले अडकून...

डाटा एंट्री कॉम्प्युटर ऑपरेटरच्या कामाला एक लाखाचा पगार मिळणार, हे ऐकूनच बेळगावातील तरुण खुश झाले होते. या कामासाठी इतका मोठा पगार कसा? अशी विचारणा कुतूहलापोटी या तरुणांनी कंपनीकडे केली. तुम्हाला दरमहा 8 लाखांचे टार्गेट दिले जाईल, सावजांना गंडवून आठ लाख रुपये मिळविणाऱ्यांना 1 लाख रुपये पगार दिला जाईल, असे सांगण्यात आले. कॉन्ट्रॅक्टवर सही करून कामाला सुरुवात केल्यानंतर जेवण व राहण्याची व्यवस्था कंबोडियातील कंपनीच करते. आम्ही प्रश्न विचारला म्हणून कंपनीने आम्हाला पाणीही दिले नाही, असे प्रशांत व केशव यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले. एक वर्षाचा करार मोडून मायदेशी परत जायचे असेल तर 3 हजार युएस डॉलर डिपॉझिट केल्यावरच कर्मचाऱ्यांना मायदेशी जाण्यासाठी मुभा दिली जाते. नहून त्या बहुमजली इमारतीतच त्यांना खितपत पडावे लागते. या तरुणांनी कंबोडियातील आपला नोकरीचा अनुभव व भारतीय तरुण तेथे कसे अडकले आहेत, याविषयी खासदार जगदीश शेट्टर यांना एक पत्र देऊन माहिती दिली आहे. अनेक भारतीय तरुण मनात नसतानाही तेथे कामावर आहेत, असेही या तरुणांचे म्हणणे आहे.

Advertisement
Tags :

.