ए. एस. ट्रेडर्सच्या घोटाळ्याचा कोल्हापूर एसआयटी करणार तपास
पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांचा निर्णय : तीन अधिकाऱ्यांसह 8 कर्मचाऱ्यांची नेमणूक: जिह्यात दुसऱ्यांदा विशेष पथकाची नेमणूक
कोल्हापूर/ आशिष आडिवरेकर
ए. एस. ट्रेडर्सच्या फसवणूकीची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत निघाली असून, या घोटाळ्याचा तपास करण्यासाठी शुक्रवारी एसआयटी (विशेष तपास पथकाची) निर्मीती करण्यात आली. पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांनी या तपासासाठी 1 पोलीस निरीक्षक, 1 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 1 पोलीस उपनिरीक्षकासह 8 अंमलदार अशी 11 जणांची नेमणूक या विशेष पथकात केली आहे. यामुळे या तपासाला आता आणखी गती मिळून सर्वसामान्य गुंतवणूकदारांना लवकरात लवकर पैसे मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
कमीत कमी कालावधीमध्ये गुंतवणुकीवर दामदुप्पट परतावा देण्याच्या अमिषाने ए. एस. ट्रेडर्सने राज्यभरातील गुंवतणूकदारांना हजारो कोटी रुपयांना गंडा घातल्याचे समोर आले होते. याबाबत ए. एस. ट्रेडर्ससह कंपनीचा मुख्य सुत्रधार लोहतसिंह सुभेदारसह अन्य संचालक अशा 27 जणांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुरुवातील हा तपास शाहूपुरी पोलिसांनी केला, मात्र फसवणूकीची व्याप्ती वाढल्यानंतर तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग करण्यात आला. तपासामध्ये आणखी काही नावे निष्पण्ण झाल्यानंतर एजंट, त्यांना मदत करणारे सहाय्यक अशा एकूण 36 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात मुख्य सुत्रधार लोहितसिंग सुभेदारसह 14 जणांना अटक करण्यात आली आहे. तर उर्वरीत 22 जणांना शोध सुरु आहे.
या प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेवून पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांनी शुक्रवारी या घोटाळ्याच्या चौकशीसाठी एका विशेष पथकाची नेमणूक केली आहे. हे पथक केवळ ए. एस. ट्रेडर्स आणि यासारख्याच गुह्यांचा तपास करणार आहे. दरम्यान ए. एस. ट्रेडर्स प्रकरणामध्ये आत्तापर्यंत 22 कोटी रुपयांची संपत्ती कोल्हापूर पोलिसांनी जप्त केली आहे. यामध्ये अलिशान मोटारी, उच्चभ्रु ठिकाणी जागा, बंगले, फ्लॅट, सोने चांदीचे दागिने यासह 5 कोटी रुपयांची रोकडही जप्त केली आहे. दरम्यान या प्रकरणामध्ये अजूनही तपास होणे बाकी असल्यामुळे शुक्रवारी पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांनी एका विशेष पथकाची नेमणूक केली आहे. यामध्ये 3 अधिकाऱ्यांसह 8 अंमलदारांची नेमणूक करण्यात आली आहे.
या मुद्यांचा तपास होणे बाकी
- संशयितांना तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांनी मदत केली काय
- गुंतवलेले पैसे कोठे खर्च केले
- रक्कम देशाबाहेर नेली कशी, रक्कम बाहेर नेण्यास मदत करणाऱ्यांना सह आरोपी करणे
- उर्वरीत आरोपींचा शोध घेवून अटक करणे
- जप्त केलेल्या मालमत्तांचा लिलाव करुन गुंतवणूकदारांना पैसे परत करणे
- फॉरेन्सिक ऑडीट करणे
11 जणांविरोधात लुक आउट नोटीस
या फसवणूकीतील मूळ आरोपी परदेशात पळून गेल्याची माहिती तपासामध्ये समोर आली आहे. यामुळे कोल्हापूर पोलीस दलाने 11 जणांविरोधात लूक आउट नोटीस लागू केलेली आहे. या 11 जणांना विमानतळ, सागरी मार्ग किंवा देशाच्या सिमांवर दिसताक्षणी अटक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
जिह्यात दुसऱ्यांदा एसआयटीची स्थापना
कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आजपर्यंत दोनदा विशेष तपास पथक (एसआयटी) ची स्थापना करण्यात आली आहे. यापूर्वी 2015 मध्ये तत्कालीन पोलीस अधिक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी ज्येष्ठ कामगार नेते कॉम्रेंड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना केली होती. हा तपास दहशतवाद विरोधी पथकाकडे वर्ग झाल्यानंतर तत्कालीन पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी ही एसआयटी पोलीस दलाकडे वर्ग केली. यानंतर आता पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांनी ए. एस. ट्रेडर्स घोटाळ्याच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना केली आहे.
ए. एस. ट्रेडर्सच्या फसवणूकीचा आकडा व व्याप्ती वाढत आहे. यामुळे या तपासासाठी एक विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. ए. एस ट्रेडसचा तपास आता यापुढे एसआयटी मार्फत होणार आहे. अशी माहिती पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांनी तरुण भारत संवाद सोबत बोलताना दिली.