शिवाजी विद्यापीठात साकारणार रग्बी खेळाचे मैदान!
कुलगुऊ डॉ. दिगंबर शिर्के यांचा पुढाकार : असोसिएशन, विद्यापीठ पातळीवर स्पर्धांचे मैदानात आयोजन करता येणार
संग्राम काटकर कोल्हापूर
शिवाजी विद्यापीठात मेघनाथ नागेशकर क्रीडांगण, अत्याधुनिक सिंथेटिक ट्रॅकनंतर आता लवकरच रग्बी या खेळाचे मैदान तयार केले जाणार आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी मैदानासाठी विशेष पाऊल उचलले आहे. त्यांनी विद्यापीठातील सिंथेटिक ट्रॅकच्या नजिकच्या जागेसह अन्य दोन जागा निवडल्यात आहेत. तज्ञांचा सल्ला घेऊन योग्य जागेवर रग्बी खेळाचे मैदान बनवले जाणार आहे. त्यासाठी विद्यापीठ विशेष निधीचीही व्यवस्था करणार आहे. रग्बी खेळाचे मैदान बनवण्याचे स्वप्न पाहताना कुलगुऊ डॉ. शिर्के यांनी राज्यासह शिवाजी विद्यापीठाने रग्बी खेळात केलेल्या कामगिरीचा गांभिर्याने विचार केला आहे.
जागतिक पातळीवर हात व पायाने खेळला जाणारा रग्बी हा खेळ महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरबरोबरच सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, पुणे, मुंबई, ठाणे नाशिक, धाराशिव, नंदुरबार, नागपूर, बीड, जळगाव, यासह 24 जिह्यांमध्ये असोसिएशन, शाळा-महाविद्यालय पातळीवर खेळला जातो. ज्या खेळाडूच्या अंगात क्षमता, ताकत व सहनशिलता आहे, तोच मैदान गाजवू शकतो, असा हा रग्बी खेळ आहे. कोल्हापूर जिल्हा रग्बी फुटबॉल असोसिएशनचे पेट्रन-इन-चीफ मालोजीराजे छत्रपती, मधुरीमाराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिह्यातील शहरी व ग्रामीण भागातील पाच ते सात हजार ताकतवर मुले-मुली रग्बी खेळाचा सराव करताहेत. असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. अमर सासने व प्रशिक्षक दीपक पाटील यांनी रग्बी खेळाला ग्रामिण भागाने पोहोचले आहे. कुरुकली येथील भोगावती महाविद्यालयाचे प्रा. राहुल लहाने यांनी तर करवीर तालुक्यातील अनेक गावातील मुला मुलींना रग्बी खेळाकडे वळवले आहे. या सगळ्याची फलप्राप्ती म्हणून गेल्या पाच-सहा वर्षात कोल्हापूर जिह्यातील 11 महिला व पुरुष खेळाडू आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतीय रग्बी संघातून आणि तीनशेवर खेळाडूंनी राष्ट्रीय स्पर्धामध्ये महाराष्ट्र संघातून प्रतिनिधित्व केले आहे.
ग्रामिण भागात रग्बीचा प्रसार करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा रग्बी असोसिएशन व भोगावती महाविद्यालय यांच्यामध्ये सामंजस्य करारही झाला आहे. राज्यस्तरीय शालेय 14, 17 व 19 वर्षाखालील मुला-मुलींच्या रग्बी स्पर्धांमध्ये कोल्हापूरातील विविध शाळांच्या संघांनी सुवर्णपदकांची लयलूट केली आहे. जिल्हा परिषदेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिह चव्हाण यांनी तर शिंगणापूर क्रीडा प्रशालेमध्ये रग्बी खेळ सुरू करून मुला-मुलींना रग्बी खेळण्याची संधी उपलब्ध केली आहे. शाळा, महाविद्यालयांमधील रग्बीचा प्रसार पाहून शिवाजी विद्यापीठाने 2018 साली राज्यात विद्यापीठ पातळीवर पहिला पुरुष संघ तयार केला. या संघाने 2018 साली भुवनेश्वरमध्ये (ओडिशा) झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेमध्ये भल्या भल्या संघांना हरवून सुवर्णपदक पटकावले. 2021 साली विद्यापीठाने महिला रग्बी संघ बनवला. या संघानेही 2021-22, 2022-23 साली झालेल्या अ. भा. आंतरविद्यापीठ रग्बी स्पर्धेत कांस्यपदक मिळवले. नुकत्याच मोहाली (पंजाब) येथील चंदिगड विद्यापीठात झालेल्या अ. भा. आंतरविद्यापीठ महिला रग्बी स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक जिंकण्याची किमया शिवाजी विद्यापीठ संघाने केली आहे. रग्बी खेळाची ही प्रगती पाहून प्रभावित झालेल्या शिवाजी विद्यापीठाने रग्बी खेळाचे मैदान विद्यापीठात बनवण्याचे पक्के केले आहे. त्यासाठी कुलगुरू डॉ. शिर्के व कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. बालेवाडी (पुणे) व मुंबईतील बॉम्बे जिमखानाच्या धर्तीवर रग्बी मैदान बनणार आहे. या मैदानामुळे असोसिएशनपासून ते विद्यापीठ पातळीवर स्पर्धांचे आयोजन करणे सोपे जाणार आहे. याशिवाय जुन्या-नव्या खेळाडूंना रग्बीच्या सरावासाठी हक्काचे मैदान मिळणार आहे. या मैदानातून खेळाडूंना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये स्थान मिळवण्यासाठीचा राजमार्गही उपलब्ध होणार आहे. खेळाडू म्हणूनच नव्हे तर पंच म्हणूनही करिअर करण्याची संधी देखील याच मैदानातून इच्छूकांना मिळणार आहे.
शिवाजी विद्यापीठाचा दैनंदिन कामभार पाहतानाच कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के हे विद्यापीठाच्या क्रीडा विकासाकडे गांभिर्याने पाहतात. राष्ट्रीय, आतंरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये प्राविण्य प्राप्त खेळाडूंना मोठ्या रकमेच्या शिष्यवृत्ती देण्याला त्यांनीच सुऊवात केली आहे. आता त्यांनी विद्यापीठात रग्बी खेळाचे मैदान बनवण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. हे मैदान क्रीडानगरी कोल्हापूरच्या वैभवात भर घालेल, अशा पद्धतीने बनवण्याचा त्यांनी निर्धार केला आहे.
डॉ. शरद बनसोडे (क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक : शिवाजी विद्यापीठ)