‘विकसित भारत 2047’साठी मजबूत डेटा प्रणाली आवश्यक
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
2047 पर्यंत ‘विकसित भारत’ हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी देशाला सांख्यिकीय प्रणाली देशाच्या विकासाच्या महत्त्वाकांक्षेशी सुसंगत ठेवावी लागेल. डिजिटल, औपचारिक आणि परस्परांशी जोडलेल्या अर्थव्यवस्थेसोबत भारताच्या सांख्यिकीय प्रणालीमध्ये वेगाने बदल होणे आवश्यक आहे, असे सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने आयोजित केलेल्या राज्य नियोजन, वित्त आणि माहिती तंत्रज्ञान सचिवांच्या परिषदेच्या उद्घाटन सत्राला संबोधित करताना पंतप्रधानांचे मुख्य सचिव पी. के. मिश्रा यांनी सांगितले.
भारताच्या विकासाची कहाणी ही ‘मुळात राज्यांची कहाणी’ असल्याचे वर्णन करून, त्यांनी अधिकृत डेटाची गुणवत्ता सुधारण्यासाठी अधिक मजबूत संस्थात्मक क्षमता आणि केंद्र व राज्यांमध्ये अधिक घनिष्ठ समन्वयाची गरज असल्याचे आवाहन केले. एका मजबूत सांख्यिकीय प्रणालीमुळे सरकारांना राज्ये आणि जिह्यांमधील विकासाच्या प्रगतीचे मोजमाप करणे, धोरणात्मक परिणामांचे मूल्यांकन करणे, त्रुटी ओळखणे आणि सरकारी संसाधने अपेक्षित परिणाम देतील याची खात्री करता आली पाहिजे.
केवळ राष्ट्रीय स्तरावरील आकडेवारी पुरेशी नाही
राज्य, जिल्हा आणि स्थानिक पातळीवरही सर्वसमावेशक डेटा संकलन आवश्यक असेल. कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, भू-स्थानिक प्रणाली, उपग्रह प्रतिमा आणि प्रगत विश्लेषण यांसारख्या अनेक संधी अधिकृत डेटा सुधारण्यासाठी आहेत, असे मिश्रा म्हणाले. तथापि, तंत्रज्ञानाच्या वापरासाठी डेटाची गुणवत्ता, पारदर्शकता, गोपनीयता, सुरक्षा आणि उत्तरदायित्व याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. शिवाय, डेटाचा वापर गोपनीयतेच्या किंमतीवर होऊ शकत नसल्याचेही सांगितले आहे.