For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

माणसाला हरविणारा यंत्रमानव

06:36 AM Jul 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
माणसाला हरविणारा यंत्रमानव
Advertisement

आगामी काळात मानव आणि यंत्रमानव किंवा रोबो यांच्यात कार्यशक्तीच्या दृष्टीने स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत यंत्रमानव मानवाला हरविणार, अशी चिन्हे दिसू लागली आहेत. मानवाजवळ बुद्धीची देणगी आहे. या देणगीच्या आधारे त्यानेच यंत्रमानवाची निर्मिती केली आहे. तथापि, ही निर्मिती आता मानवाला डोईजड ठरणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. कृत्रिम बुद्धीमत्तेचे तंत्रज्ञान जसे अधिकाधिक प्रगत होत जाईल, तसा हा प्रश्न अधिकाधिक बिकट होत जाईल.

Advertisement

याची झलक आता भारतातही बघावयास मिळत आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्वच्छतेचे काम करण्यासाठी यंत्रमानवाची नियुक्ती करण्यात आली आहे. हा यंत्रमानव त्याचे काम तर अतिशय चोख करतोच, शिवाय तो सलग, न थांबता, क्षणभरही विश्रांती न घेता आठ तास काम करु शकतो. कोणताही मानवी स्वच्छता कामगार असे करु शकत नाही. त्याला कामाच्या मध्ये विश्रांतीची आवश्यकता भासते. तसेच त्याच्या हातून कामात चूक होण्याची, किंवा दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. पण हा यंत्रमानव अशी कोणतीही त्रुटी न दाखविता काम करु शकतो. त्याच्या कामाच्या गुणवत्तेसंबंधी कोणीही कोणताही आक्षेप घेऊ शकत नाही. विमानतळावरील हा यंत्रमानव भारतनिर्मित असल्याची माहिती दिली जाते. एका चार्जिंगमध्ये तो 70 हजार चौरस फुटाचे क्षेत्र चकाचक करु शकतो. सध्या असे 8 यंत्रमानव या विमानतळावर नियुक्त करण्यात आले आहेत. कार्यशक्ती आणि अचूकता यात तर ते मानवापेक्षा श्रेष्ठ आहेतच. शिवाय ते कधी संपावर जात नाहीत. चार्जिंग वगळता त्यांची इतर कोणतीही मागणी नसते. एकच दक्षता घ्यावी लागते. ती म्हणजे हे यंत्रमानव नेहमी तंदुरुस्त अवस्थेत ठेवावे लागतात. त्यांच्यात यांत्रिक बिघाड होऊ दिला नाही, तर ते वर्षानुवर्षे आपले काम बिनबोभाट आणि चोखपणे करु शकतात.

अर्थातच, यातून काही गंभीर प्रश्नही निर्माण होतात. मानवाची कामे यंत्रमानव करु लागले, तर मानवी हातांना काम कसे मिळणार ? काम मिळाले नाही, तर ते जगणार कसे ? ज्या देशांची लोकसंख्या कमी आहे आणि ज्या देशांमध्ये मानवबळाची कमतरता आहे, तेथे ठीक आहे. पण भारतासारख्या अवाढव्य लोकसंख्येच्या देशात माणसांना बेकार ठेवणे कसे शक्य होणार ? असे अनेक प्रश्न आहेत. तथापि, काळ कोणासाठी थांबत नाही. नवे तंत्रज्ञान आपल्याला स्वीकारावेच लागते. अन्यथा आपण जगाच्या स्पर्धेत मागे पडण्याची शक्यता असते. असे मागे पडणेही हानीकारकच असते. त्यामुळे ‘इकडे आड आणि तिकडे विहीर’ अशी ही अवस्था आहे. सुवर्णमध्य काढण्याचा प्रयत्न करणे एवढेच आपल्या हाती आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.