Sangli News | थेट 'थार' गाडीतून वाजत-गाजत एन्ट्री! सांगलीत जिल्हा परिषद शाळेच्या चिमुकल्यांचं राजेशाही स्वागत
मिरज - मिरज तालुक्यातील मालगाव येथील जिल्हा परिषद शाळा, रामनगर येथे प्रवेशोत्सव अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला. पहिल्याच दिवशी १२ नव्या विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश घेतला. विशेष म्हणजे, नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची चक्क 'थार' गाडीतून वाजत-गाजत काढलेली प्रवेश फेरी संपूर्ण गावात चर्चेचा विषय ठरली.
जिल्हा परिषद शाळा ही आता केवळ सर्वसामान्यांची शाळा राहिली नसून ती खऱ्या अर्थाने 'गुणवंतांची शाळा' बनली आहे. ग्रामीण भागातील पालक 'दुसरा पर्याय नाही' म्हणून नव्हे, तर दर्जेदार शिक्षण चित्रही बदलत आहे. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश पोळ यांच्या 'थार' गाडीतून या नव्या चिमुकल्यांना वाजत-गाजत मोठ्या दिमाखात शाळेत आणण्यात आले. या अनोख्या व राजेशाही स्वागतामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद ओसंडून वाहत होता. या शानदार प्रवेशोत्सवासाठी मिरज पंचायत समितीचे उपसभापती ललिताताई शेजुळ, मालगाव केंद्राचे केंद्रप्रमुख तय्यबअली नदाफ आणिशाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश पोळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
ग्रामस्थ व समिती सदस्य संभाजी हनगंडे, विजय माळी, अनिल हनगंडे, नागेश तोडकर, नामदेव माळी, निलेश माळी, विठ्ठल पाटील, आनंदा गडदे, भरत शेडबाळ, योगेश बने यांच्यासह अंगणवाडी सेविका मालन पोळ, मदतनीस गोकुळा लोकुरे यांनीही या कार्यक्रमात सहभाग घेतला. या आनंददायी सोहळ्याचे प्रास्ताविक मुख्याध्यापक अमोल शिंदे यांनी केले. तर आभार राजकुमार भोसले यांनी मानले. याशिवाय परिसरातील माता-पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला. दर्जेदार शिक्षण आणि आधुनिक दृष्टिकोन यामुळे रामनगर जिल्हा परिषद शाळेची गुणवत्ता दिवसागणिक वाढत असल्याची भावना ग्रामस्थांमधून व्यक्त केली जात आहे.