समुद्रात वाहणारी नदी
नद्या या भूमीवर उगम पावतात आणि वहात जाऊन अखेर समुद्राला मिळतात, हे आपल्यापैकी जवळपास प्रत्येकाला माहीत आहे. तथापि, प्रत्यक्ष समुद्रातच नदी वाहते, हे आपल्याला अविश्वसनीय वाटण्याची शक्यता आहे. तथापि, हे सत्य आहे. संशोधकांनी अशा काही नद्यांचा शोध लावला आहे, की ज्या समुद्रातच उगम पावतात आणि समुद्रातच वाहतात. भूमीवर वाहणाऱ्या नद्यांपेक्षाही या समुद्रात वाहणाऱ्या नद्या अधिक वेगवान असतात आणि त्यांची लांबीही मोठी असते, असे दिसून आले आहे. या नद्यांना समुद्रांमधील अंत:प्रवाह असेही नाव देण्यात आले आहे. अशी एक नदी अटलांटिक महासागरात काँगो नदी ज्या स्थानी या महासागराला मिळते, त्या स्थानाच्या नजीक आहे, असा शोघ संशोधकांनी लावला आहे. ही नदी अटलांटिक महासागराच्या तळाशी असलेल्या उंचसखल खडकाळ भागातून वाहते. या महासागराच्या तळाशी काँगो केनॅम नावाचे एक खोरे आहे. या खोऱ्यातून ही समुद्रनदी वाहते. अशा नद्या कशा निर्माण होतात, असा प्रश्न आपल्याला पडतो. त्याचेही उत्तर संशोधकांनी दिले आहे. कोणतीही नदी जेव्हा समुद्राला मिळते, तेव्हा ती आपल्यासमवेत गाळ, माती आणि वाळू घेऊन समुद्रात शिरते. हा गाळ, पाणी आणि वाळू काही काळाने समुद्राच्या तळाशी असणाऱ्या खोऱ्यांपर्यंत पोहचतात. त्यानंतर, या तीन वस्तू त्या खोऱ्यातून वाहू लागतात. त्यांचे वाहणे भूमीवरच्या नद्यांप्रमाणेच असते. त्यांचा वेग मात्र अधिक असतो. समुद्रात आधीच इतके पाणी असताना नद्या कशा निर्माण होतात, हा प्रश्नही अनेकांना पडतो. त्याचे उत्तर असे आहे की, समुद्राच्या पाण्याचा दाब प्रत्येक स्थानी समप्रमाणात नसतो. तो तळाकडे जास्त असतो. या दाबातील अंतरामुळे समुद्रात अंत:प्रवाह निर्माण होतात. ते नद्यांसारखेच वाहू लागतात. समुद्राचे पाणी एकजिनसी नसणे, हे अंत:प्रवाह निर्माण होण्याचे प्रमुख कारण असल्याचे संशोधक मानतात.
