क्रिकेट क्षितिजावरील उगवता तारा
वैभव सूर्यवंशी.. हे नावं सध्या एवढ्या चर्चेत आहे.. जेवढं इस्रायल-इराण युद्ध आणि धुरंधर सिनेमा.
कारणही तसेच आहे.
15 वर्ष 4 दिवस वयाचा हा बिहारी बाबू वेगवेगळ्या सामन्यागणिक रेकॉर्ड्स तोडतोय, विक्रम करतोय. त्याची बॅट अशी तळपतेय की भल्या भल्या गोलंदाजांच्या नाकी नऊ आणलंय या पठ्ठ्याने....
त्याची फलंदाजी पाहून आजी-माजी दिग्गज खेळाडू, क्रीडा समीक्षक, टीव्ही समालोचक सर्वजण अक्षरश: स्तुतिसुमने उधळत आहेत.
क्रिकेट सामना म्हटलं की वैभव सूर्यवंशी हे नाव अग्रस्थानी आणि अर्थातच चर्चेत....
तुम्ही म्हणाल हा एवढा प्रतिभाशाली खेळाडू भारतीय संघात का नाही?
त्याचं असं आहे. आयसीसीने नियमात 2020 साली बदल केले. आणि 15 वर्षापेक्षा कमी वयाच्या खेळाडूस राष्ट्रीय (सिनिअर्स) संघातून खेळण्यावर बंदी घातली. (अर्थात त्याला सुरक्षा वगैरे कारणे असणारच)
हा गुटगुटीत बालक विक्रम करत असताना 14-15 वर्षाचा होता. त्यामुळे त्याचा निवडीसाठी विचार होऊ शकत नव्हता हे ओघाने आलेच.
नुकताच म्हणजे 27 मार्चला त्याने वयाची 15 वी गाठली असून तो लवकरच भारतीय संघात दिसेल हे सांगायला ज्योतिष्याची गरज नसावी.
क्रिकेटमधील हे वैभवशाली प्रकरण काय आहे?
प्रत्येक पिढीतून एकदा, अशी एखादी क्रीडा प्रतिभा उदयास येते जी संपूर्ण राष्ट्राला मोहित करते. 2024/25 पासून भारतीय क्रिकेटसाठी वैभव सूर्यवंशीही अशीच एक दुर्मीळ घटना आहे.
वैभव सूर्यवंशीचा जन्म 27 मार्च 2011 रोजी बिहारमधील समस्तीपूर जिह्यातील ताजपूर या लहानशा गावात झाला. एका साध्या, मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेल्या वैभवच्या सुरुवातीच्या काळात साधेपणा, शिस्त आणि खेळावरील प्रेम हे गुण होते. क्रिकेट त्याच्यासाठी केवळ एक खेळ नव्हता; ते त्याचे ध्येय होते.
त्याचे वडील, संजीव सूर्यवंशी, यांनी आपल्या मुलाची स्वप्ने जोपासण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. आर्थिक अडचणी असूनही, संजीव यांनी प्रचंड त्याग केला; वैभवच्या क्रिकेट प्रशिक्षणासाठी आणि प्रवासासाठी निधी उभारण्याकरिता त्यांनी आपल्या वडिलोपार्जित शेतजमिनीचा काही भाग विकला. अशा खंबीर पालक पाठिंब्यानेच वैभवच्या उत्तुंग यशाचा भावनिक आणि आर्थिक पाया घातला गेला.
वैभव सूर्यवंशीने 2024 मध्ये वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षी रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण करून इतिहास रचला आणि बिहारसाठी असे करणारा तो दुसरा सर्वात तरुण खेळाडू ठरला. आपल्या सुरेख फटकेबाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या वैभवने ऑस्ट्रेलियाच्या 19 वर्षांखालील संघाविरुद्ध 58 चेंडूंमध्ये शतक झळकावून एक विक्रम प्रस्थापित केला, जो युवा कसोटी सामन्यांमध्ये कोणत्याही भारतीय खेळाडूने केलेले सर्वात वेगवान शतक ठरले. त्याच्या या वेगवान प्रगतीमुळे तो आयपीएल करार मिळवणारा सर्वात तरुण खेळाडू बनला, आणि राजस्थान रॉयल्सने आयपीएल 2025 च्या आधी त्याला 1.1 कोटी रुपयांना करारबद्ध केले. संजू सॅमसन आणि यशस्वी जैस्वाल यांसारख्या दिग्गज खेळाडूंसोबत सराव करत असल्यामुळे, आता त्याला आपला खेळ अधिक सुधारण्यासाठी आणि उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ मिळाले आहे.
वैभवने वयाच्या 12 व्या वर्षी बिहारच्या 19 वर्षांखालील संघाकडून विनू मंकड ट्रॉफी खेळली. 2023 मध्ये, त्याने एका चौरंगी मालिकेत भारत ‘बी‘ अंडर-19 संघाकडून खेळताना, दोन अर्धशतकांसह सहा डावांमध्ये 177 धावा केल्या.
सप्टेंबर 2024 मध्ये, त्याने ऑस्ट्रेलिया अंडर-19 विरुद्ध भारत अंडर-19 संघाकडून पदार्पण केले. त्याने आपल्या अंडर-19 कसोटी पदार्पणात 58 चेंडूंमध्ये शतक झळकावले, जे कोणत्याही भारतीय अंडर-19 खेळाडूसाठी सर्वात वेगवान शतक होते, त्यानंतर तो 104 धावांवर धावबाद झाला. हे अंडर-19 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दुसरे सर्वात वेगवान शतक होते.
2024 च्या एसीसी अंडर-19 आशिया कपमध्ये, वैभवने यूएई अंडर-19 विरुद्ध 46 चेंडूंमध्ये 76 धावा केल्या, त्यानंतर श्रीलंकेच्या अंडर-19 विरुद्ध उपांत्य फेरीत 36 चेंडूंमध्ये 67 धावा केल्या. नोव्हेंबर 2025 मध्ये, त्याने आशिया कप रायझिंग स्टार्स टी-20 सामन्यात संयुक्त अरब अमिरातीविरुद्ध भारत ‘अ‘ संघाकडून खेळताना अवघ्या 42 चेंडूंमध्ये 144 धावा तडकावल्या. त्याने आपले शतक केवळ 32 चेंडूंमध्ये पूर्ण केले. 2026 च्या आयसीसी अंडर-19 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात वैभवने इंग्लंडविरुद्ध 80 चेंडूंमध्ये 175 धावा झोडपल्या, ज्यात 15 चौकार आणि 15 षटकारांचा समावेश होता आणि त्याने एक विक्रम मोडणारी खेळी केली. 2025 च्या स्पर्धेत गुजरात टायटन्सविरुद्ध शतक पूर्ण करण्यासाठी सूर्यवंशीला 35 चेंडू लागले, जे आयपीएलमधील दुसरे सर्वात वेगवान शतक आहे. यापूर्वी 2013 मध्ये ख्रिस गेलने पुणे वॉरियर्सविरुद्ध 30 चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले होते.
आयपीएलमध्ये एखाद्या भारतीयाने केलेले हे सर्वात जलद शतक आहे, ज्याने 2010 मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध युसूफ पठाणने 37 चेंडूंत केलेल्या शतकाचा विक्रम मोडला आहे. सूर्यवंशीच्या आधी, पठाणचे हे शतक राजस्थान रॉयल्ससाठी आयपीएलमधील सर्वात जलद शतक होते.
अशा या गुणी खेळाडूस
राष्ट्रीय सन्मान
2025 राष्ट्रीय बाल पुरस्कार, मुलांसाठी सर्वोच्च नागरी सन्मान
क्रीडा सन्मान
आयसीसी 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू : 2026 मिळाले आहेत हेही नसे थोडके.
वयाची 15 वर्षे पूर्ण होताच या बाळसेदार युवकाने 30 मार्च रोजी गुवाहाटी येथे चेन्नई विरुद्ध 15 चेंडू आणि पॉवरप्लेमधे अर्धशतक झळकावून आणखी एक विक्रम रचला.
2025 च्या हंगामात महान खेळाडू महेंद्रसिंग धोनीने त्याच्यातील गुणवत्ता हेरून तो मोठा खेळाडू होईल, असे भाकीत केले होते.
वैभवचा खेळ पाहताना असे जाणवले की तो फटके प्रचंड ताकतीने मारतो. त्याला जबरदस्त ‘बॅक लिफ्ट’चे वरदान आहे. परंतु सुरुवातीस त्याने मिडऑफ, मिडऑन वरून फटके मारताना सावधगिरी बाळगायला हवी. मोठी खेळी करायची असेल तर खेळपट्टी जोखून त्यावर टिकून राहणे आवश्यक आहे.
क्रिकेटमधील एक अलिखित नियम आहे.. खेळपट्टीवर टिकून रहा..धावा आपोआप येतील.
15 वर्षाची तांत्रिक अडचण दूर झाल्याने वैभव लवकरच भारतीय वरिष्ठ संघातून देशाचे प्रतिनिधित्व करून भारताचा क्रिकेटमधील डंका जगात दुमदुमत ठेवेल, अशी तमाम रसिकांची निश्चित अपेक्षा असेल, यात संदेह नाही...
हर कामयाबी पर तुम्हारा नाम होगा..
तुम्हारे हर कदम पर दुनियाका सलाम होगा ..
डटकर करना सामना तुम मुश्किलों का..
एक दिन वक्त भी तुम्हारा गुलाम होगा ..