मनपाच्या कारभाराचा पालकमंत्र्यांकडून आढावा
अधिकाऱ्यांना सूचना, लवकरच बैठक
बेळगाव : जय किसान भाजी मार्केट, 20 कोटी नुकसानभरपाई देणे यासह महानगरपालिकेकडून झालेल्या चुकांबाबत पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी मनपा अधिकाऱ्यांशी चर्चा केली. महानगरपालिकेमध्ये जो सावळा गोंधळ सुरू आहे, तो तातडीने थांबवा अन्यथा कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी अधिकाऱ्यांना दिला. पालकमंत्री सतीश जारकीहोळी हे बैठकीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आले असता त्यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली. मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी, महसूल उपायुक्त रेश्मा तालीकोटी, प्रशासकीय उपायुक्त उदयकुमार तळवार, कायदा सल्लागार
अॅड. उमेश महांतशेट्टी यांच्याकडून संपूर्ण माहिती घेतली. जय किसान भाजी मार्केट उभारणी करताना मनपाच्या अधिकाऱ्यांनी गैरप्रकार केला आहे.त्याबाबत चौकशी केली आहे. महत्त्वाचे म्हणजे सध्या महानगरपालिकेमध्ये 20 कोटीचा गोंधळ सुरू आहे. जागा मालकाला 20 कोटी दिले पाहिजेत, असे अधिकाऱ्यांकडूनच स्पष्ट करण्यात येत आहे. त्यामुळे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी ‘तुम्ही चुका करणार आणि बेळगावच्या जनतेला त्याचा भुर्दंड बसणार,’ असा प्रकार पहायला मिळत आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे. कोणत्याही प्रकारचे भूसंपादन करताना नियमानुसार केले पाहिजे. अन्यथा नाहक त्रास होऊ शकतो. आता तरी महानगरपालिकेने गांभीर्याने घेऊन कारभार सुधारणे गरजेचे आहे. या सर्व समस्यांबाबत लवकरच महानगरपालिकेमध्येही बैठक घेतली जाणार असल्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. शुक्रवारी अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली.