फ्रुट मार्केटच्या समस्यांचा आढावा
आमदार राजू सेठ यांच्याकडून सदाशिवनगर स्मशानभूमीलाही भेट
बेळगाव : गांधीनगर येथील फ्रुट मार्केट येथे कचऱ्याच्या विल्हेवाटीसह अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. या समस्या दूर कराव्यात अशी मागणी बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ यांच्याकडे करण्यात आली होती. त्यानुसार शनिवारी राजू सेठ यांनी फ्रुट मार्केटला भेट देऊन तेथील समस्या जाणून घेतल्या. फ्रुट मार्केटमधील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी जागा अपुरी असल्याने मार्केटच्या प्रवेशद्वारानजीकच कचरा टाकला जात आहे. याचबरोबर पावसाळ्यात पाणी साचत असल्याने चिखलाचे साम्राज्य पसरत आहे. राष्ट्रीय महामार्गालगतच्या सर्व्हिस रस्त्याचीही स्थिती खराब झाली असल्याने फळांची वाहतूक करताना अडचणी येत असल्याच्या तक्रारी आमदारांसमोर मांडण्यात आल्या. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या असून समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. तसेच फ्रुट मार्केटची कार्यक्षमता वाढविण्यासाठीही भविष्यात प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले.
आमदारांची सदाशिवनगर स्मशानभूमीला भेट
सदाशिवनगर येथील स्मशानभूमीमध्ये पायाभूत सुविधा नसल्याची तक्रार वारंवार व्यक्त होत होती. यासाठीच आमदार राजू सेठ, नगरसेवक रवी साळुंखे व मनपा अभियंता लक्ष्मी निपाणीकर यांनी स्मशानभूमीला भेट दिली. स्मशानभूमी परिसरात आवश्यक असलेले साहित्य लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल असे त्यांनी सांगितले.