तेहतीस कोटी रुपयांची ‘रिटर्न गिफ्ट’
विवाह सभारंभासाठी आलेल्या अतिथींना, ते परत जाताना वधू-वरांकडून रीटर्न गिफ्ट’ दिल्या जाण्याची पद्धत आहे. या भेटवस्तू सर्वसाधारणपणे मिठाई, एखादी गृहोपयोगी वस्तू किंवा तत्सम स्वरुपाची असते. तथापि, महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील पेठकर कुटुंबियांनी त्यांच्या घरातील लग्न समारंभासाठी आलेल्या गावकऱ्यांना एक अशी रिटर्न गिफ्ट दिली, की जिची चर्चा होत आहे. अशी रिटर्न गिफ्ट आजवर कोणीही दिली नसेल, असे मानण्यात येत आहे. या रिटर्न गिफ्टचे एकंदर मूल्य तब्बल 33 कोटी 60 लाख रुपये इतके प्रचंड आहे.
20 मे 2026 या दिवशी या पेठकर कुटुंबात हा विवाह समारंभ पार पडला. तो बहादरपुरा या पेठकर कुटुंबाच्या गावी करण्यात आला. गावात 3 हजार 465 ग्रामस्थ वास्तव्यास आहेत. या साऱ्यांना आमंत्रण देण्यात आले होते. सर्व गावकरी या विवाह सोहळ्याला आलेही होते. विवाह पारंपरीक पद्धतीनुसार यथासांग पार पडला. त्यानंतर, आलेल्या गावकऱ्यांसाठी पेठकर कुटुंबियांनी वधू-वराच्या वतीने रिटर्न गिफ्टची घोषणा करण्यात आली. गावातील प्रत्येक ग्रामस्थाला एक वर्षासाठी एक लाख रुपयांचे ‘सामुहित दुर्घटना विमा संरक्षण’ देण्यात आले. या विम्याचा हप्ता पेठकर कुटुंबियांनी भरला आहे. त्यामुळे एक वर्षभर गावातील कोणालाही नैसर्गिक अगर अन्य आपत्तीप्रसंगी 1 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळणार आहे. गावकऱ्यांना कोणतीतरी वस्तू किंवा खाण्यापिण्याचे पदार्थ यांची भेट देण्यापेक्षा ही अत्यंत उपयुक्त भेट देण्यात आली आहे. या भेटीचे एकंदर मूल्य 33 कोटी 60 लाख रुपये इतके आहे. या रिटर्न गिफ्टची चर्चा आज साऱ्या देशात होत आहे. विवाह समारंभात पैशाचा अपव्यय टाळून गावाचा एक वर्षभर लाभ होत राहील, अशा प्रकारची रिटर्न गिफ्ट देण्याच्या या संकल्पनेचे सर्वत्र कौतुक होत आहे.