सत्तेचा माज उतरविणारा निकाल!
गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी माजी खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्यासंबंधी व्हायरल झालेले अश्लील व्हिडिओ व त्यानंतर त्यांच्यावर दाखल झालेल्या बलात्कार प्रकरणामुळे केवळ कर्नाटकातच नव्हे तर संपूर्ण देशभरात ते ठळक चर्चेत आले होते. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचा प्रज्वल हा नातू आहे. गेल्या आठवड्यात लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाने बलात्कार प्रकरणी त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. त्याबरोबरच 11 लाख 25 हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. या प्रकरणात प्रज्वलला जामीनही मिळाला नव्हता. आता त्याला थेट शिक्षा झाली आहे.
न्या. संतोष गजानन भट यांनी प्रज्वलला शिक्षा ठोठावली आहे. लहान वयात मिळालेली सत्ता, अमाप संपत्ती, घराण्याचा राजकीय वारसा, आजोबा माजी पंतप्रधान, वडील माजी मंत्री, काका माजी मुख्यमंत्री अशी राजकीय परंपरा लाभूनही प्रज्वलने आपल्या विकृत कृत्यामुळे या परंपरेला गालबोट लावले होते. राजकीय वारशामुळे प्रज्वलच्या खटल्याचे काय होणार? तो सुखरुप सुटणार की त्याला शिक्षा होणार? अशी सर्वसामान्य नागरिकांमध्ये चर्चा होती. न्यायालयाने अखेर त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.
घरकाम करणाऱ्या महिलेवर वारंवार बलात्कार केल्याचा त्याच्यावर आरोप होता. हे प्रकरण उघडकीस आले, त्यावेळी लोकसभेच्या निवडणुका सुरू होत्या. त्यामुळे राजकीय कारणासाठी अश्लील चित्रफितींचा समावेश असलेले पेनड्राईव्ह हासन जिल्ह्यात वाटण्यात आले आहेत, असा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर एकापाठोपाठ एक असे चार बलात्काराचे गुन्हे त्याच्यावर दाखल झाले आहेत. केवळ एका गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. आणखी तीन गुन्ह्यांची सुनावणी व्हायची आहे.
विशेष न्यायालयाच्या या निकालाने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. तर जात, सत्ता, पैशाच्या जोरावर आपण काहीही करू शकतो या आविर्भावात वावरणाऱ्या, दिसेल ती जमीन आपलीच, एखाद्या महिलेवर मन जडले ती आपल्याकडे चालून आली पाहिजे, या आविर्भावात वावरणाऱ्या राजकीय नेत्यांना तर मोठा धक्का बसला आहे. सत्तेच्या जोरावर आपण काहीही केले तरी ते खपून जाते, या राजकीय नेत्यांच्या समजुतीला न्यायालयीन निकालाने छेद दिला आहे. मोठी राजकीय पार्श्वभूमी असली तरी त्यांनी केलेल्या गुन्ह्यासाठी त्यांना शिक्षा होऊ शकते हे अधोरेखित झाले आहे.
अलीकडे राजकीय नेत्यांसंबंधीची लैंगिक प्रकरणे वाढली आहेत. एखाद्या नेत्याला अडकवण्यासाठी त्याचा विरोधक हनीट्रॅपच्या जाळ्यात त्याला ओढून त्याला आयुष्यातून उठवण्याच्या वाईट परंपरेचा पायंडा घातला जात आहे. माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांचे प्रकरण ताजे उदाहरण आहे.
गेल्या पाच-सहा महिन्यातही अनेक नेत्यांना हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकवण्याचे प्रयत्न झाले. एखाद्याच नेत्याचा उघड माथ्याने सामना करता आला नाही तर त्याला हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकवणे आणि त्याची राजकीय कारकीर्द संपवणे ही प्रथा सुरू झाली आहे. कर्नाटकातील अनेक राजकीय नेत्यांच्या अश्लील चित्रफिती, अश्लील संभाषणे अधूनमधून समाजमाध्यमावर व्हायरल होत असतात. सुरुवातीला प्रज्वल रेवण्णा प्रकरणातही अशीच गैरसमजूत निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. ज्यावेळी त्यांच्या अश्लील चित्रफिती असलेले पेनड्राईव्ह वाटले गेले त्यावेळी प्रज्वल रेवण्णाचा खरा चेहरा उघड झाला होता. निवडणुकीच्या काळात प्रत्येक नेता हात जोडत आपल्याला निवडून द्या, अशी विनवणी करत असतो. निवडून आल्यानंतर लोकसेवेसाठी कार्यरत होणे त्याचे कर्तव्य असते. काही जण आपल्या कर्तव्याला लागतात तर आणखी काही जण इतरांवर अत्याचार करण्यासाठीच आपला जन्म झाला आहे या थाटात मनमानी सुरू करतात. त्यापैकीच प्रज्वल रेवण्णा हा एक होता.
कर्नाटकात सध्या आणखी दोन घटना ठळक चर्चेत आहेत. शाळकरी मुलांच्या पिण्याच्या पाण्यात विष घातल्याच्या त्या घटना आहेत. शिमोगा जिल्हयातील हुविनकोने, ता. होसनगर येथील सरकारी प्राथमिक शाळेच्या आवारातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीत विष मिसळण्यात आले होते. मुले ज्यावेळी पाणी पिण्यासाठी गेली त्यावेळी दुर्गंधीमुळे त्यांना संशय आला. शिक्षकांच्या प्रसंगावधानामुळे मुलांचा जीव वाचला. आणखी एक घटना बेळगाव जिल्ह्यातील हुलीकट्टी, ता. सौंदत्ती येथे घडली आहे.
प्राथमिक शाळेच्या आवारातील पाण्याच्या टाकीत विष घातल्याच्या आरोपावरून सौंदत्ती पोलिसांनी तिघा जणांना अटक केली आहे. शिमोगा जिल्ह्यातील घटनेपेक्षाही बेळगाव जिल्ह्यातील घटना वेगवेगळ्या कारणाने धक्कादायक ठरली आहे. हुलीकट्टी प्राथमिक शाळेचा मुख्याध्यापक मुसलमान आहे. त्याची बदली करण्यासाठी पाण्याच्या टाकीत एका शाळकरी मुलाला हाताशी धरून विष घालण्यात आले होते. विषमिश्रीत पाणी पिऊन जर मुलांचा मृत्यू झाला तर या घटनेला जबाबदार धरत मुख्याध्यापकाची बदली केली जाईल, त्याची बदली झाली तर आपले उद्दिष्ट साध्य होईल, असा यामागचा कट होता. विषमिश्रीत पाणी पिऊन दहा विद्यार्थी अत्यवस्थ झाले होते.
सौंदत्ती तालुका श्रीराम सेनेचा अध्यक्ष सागर पाटील, कृष्णा मादर, नागनगौडा पाटील या तिघा जणांना अटक झाली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. श्रीराम सेनेने सागर पाटील याला कधीच संघटनेतून बाजूला काढण्यात आल्याचे जाहीर केले आहे. गेल्या दहा-बारा वर्षांपासून मुख्याध्यापक पदावर असलेल्या सुलेमान घोरीनायक यांना या पदावरून हटवण्यासाठी हे कृत्य केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. सुदैवाने अत्यवस्थ मुलांची प्रकृती सुधारली आहे. कोणाच्या जीवाचे बरेवाईट झाले असते तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
शाळकरी मुलांच्या पाण्यात विष घालणारा कोणत्याही संघटनेचा असो, कोणत्याही जातीधर्माचा असो, मुलांच्या जीवाशी खेळ करण्याचे पातक त्याने केले आहे. मुख्याध्यापकाची बदलीच करायची होती तर कायदेशीर मार्गाने अर्जविनंती करायला हवी होती. तसे न करता आपल्याच गावातील मुलांचा जीव जाईल, याचा विचारही न करता पाण्याच्या टाकीत त्याच शाळेतील एका मुलाला हाताशी धरून विष घालणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे. मुख्याध्यापक अन्य धर्मीय आहे, या द्वेषापोटी मुलांचा जीव धोक्यात आणणे, त्यांच्या पाण्यात विष मिसळणे आदी कृत्यांचे समर्थन कोणीच करणार नाही.