महाराष्ट्राचा बोनस गुणासह दणदणीत विजय
मुंबईचा सामना अनिर्णीत
वृत्तसंस्था/ औरंगाबाद
महाराष्ट्राने रणजी चषक स्पर्धेतील ‘अ’ गटातील सामन्याच्या अखेरच्या दिवशी मंगळवारी सलामीवीर मुर्तझा ट्रंकवाला आणि सिद्धेश वीर यांच्या कामगिरीच्या बळावर मेघालयाला 10 गडी राखून पराभूत केले आणि बोनस गुणाचीही कमाई केली. मुर्तझाने सर्वाधिक धावा करताना फक्त 73 चेंडूंत नाबाद 78 धावा केल्या, तर सिद्धेशने (नाबाद 24) त्याला आदर्श साथ दिली. सकाळच्या सत्रात मेघालयाला 185 धावांत गुंडाळल्यानंतर महाराष्ट्राने केवळ 21.1 षटकांत आपले ध्येय गाठले.
मेघालयाने पहिल्या डावात 276 धावा केल्या होत्या आणि महाराष्ट्राने त्याला प्रत्युत्तर देताना 361 धावा केल्या होत्या. त्यानंतर ईशान्येकडील संघ दुसऱ्या डावात केवळ 185 धावाच करू शकल्याने 100 हून थोड्याशा जास्त धावा काढण्याचे सोपे उद्दिष्ट महाराष्ट्रासमोर रहिले होते. त्यांनी ते फारशा अडचणीविना यशस्वीपणे पार केले.
तत्पूर्वी, सोमवारी खेळ संपला तेव्हा 8 बाद 157 अशा स्थितीत असलेल्या मेघालयाने 28 धावा जोडून उर्वरित दोन फलंदाज गमावले. महाराष्ट्राचा डावखुरा वेगवान गोलंदाज मुकेश चौधरीने चार बळी घेतले. 45 धावा करून सुमित कुमार हा मेघालयातर्फे दुसऱ्या डावात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. वेगवान गोलंदाज रजनीश गुरबानी याने त्याला बाद केले आणि तो बाद होणारा शेवटचा खेळाडू ठरला.
महाराष्ट्र दुसरा डाव खेळण्यासाठी उतरल्यानंतर मुर्तझाला उद्दिष्ट पार करण्याची घाई झालेली स्पष्टपणे दिसत होती. राज्याच्या विविध वयोगटांतील संघांत खेळून प्रगती केलेल्या या 28 वर्षीय सलामीवीराने 13 चौकार हाणले. सहकारी सलामीवीर सिद्धेशने दुसऱ्या बाजूने त्याला साथ देण्याची भूमिका पार पाडली.
संक्षिप्त धावफलक-मेघालय पहिला डाव 276 आणि दुसरा डाव 55.5 षटकांत 185 (बालचंदर अनिऊद्ध 36, सुमित कुमार 45 धावा, मुकेश चौधरी 4/61, प्रदीप दधे 2/29, रजनीश गुरबानी 2/33), महाराष्ट्र पहिला डाव 361 आणि दुसरा डाव 21.1 षटकांत बिनबाद 104 धावा (मुर्तझा ट्रंकवाला नाबाद 78, सिद्धेश वीर नाबाद 24 धावा)
मुंबई-त्रिपुरा सामना अनिर्णित
आगरतळा येथे मुंबई आणि त्रिपुरा यांच्यातील 2‘अ’ गटातील सामना अनिर्णित राहिला आणि विद्यमान विजेत्यांनी पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर तीन गुणांची कमाई केली. सोमवारी तिसऱ्या दिवशी 2 बाद 7 अशी घसरण झालेल्या मुंबईने मंगळवारी त्यांचा दुसरा डाव 6 बाद 123 धावांवर घोषित करून प्रतिस्पर्ध्यांसमोर 272 धावांचे लक्ष्य ठेवले. अजिंक्य रहाणे 90 चेंडूंत 48 धावा करून नाबाद राहिला. त्याने एका टप्प्यावर 5 बाद 44 अशी स्थिती झालेल्या मुंबईची घसरण थांबवली. दिवसाचा खेळ संपला तेव्हा त्रिपुराने बिनबाद 48 धावा केल्या होत्या.
संक्षिप्त धावफलक-मुंबई पहिला डाव 450 आणि दुसरा डाव 43 षटकांत 6 बाद 123 घोषित (अजिंक्य रहाणे नाबाद 48 धावा, अभिजित सरकार 3/31, मणिशंकर मुरासिंग 2/11), त्रिपुरा पहिला डाव 95.4 षटकांत 302 आणि दुसरा डाव 22 षटकांत बिनबाद 48 (बिक्रमकुमार दास नाबाद 32 धावा)