इतिहास विभागांतर्गत अध्यासन दुर्मीळ संदर्भ ग्रंथांचे भांडार
कोल्हापूर / अहिल्या परकाळे :
शिवाजी विद्यापीठातील इतिहास विभागांतर्गत छत्रपती शाहू महाराज मराठा इतिहास अध्ययन केंद्र आणि छत्रपती संभाजी महाराज संशोधन केंद्र सुरू आहे. या केंद्रांमध्ये पावणेतीन हजार दुर्मीळ ऐतिहासिक संदर्भग्रंथ तर जवळजवळ २ लाख मोडी लिपी कागदपत्रे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या कालखंडातील मराठ्यांचा इतिहासासंदर्भातील कागदपत्रे या केंद्रात आहेत. या कागदपत्रांसह संदर्भग्रंथांचा अभ्यास अनेक संशोधक करीत आहेत. म्हणूनच संदभचि भांडार म्हणजे इतिहास विभागातील संशोधन केंद्र, अशी ओळख देशभर आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मराठा इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या केंद्रांचा घेतलेला आढावा.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेली मराठा सत्ता अठराव्या शतकात गुजरात, राजस्थान, माळवा, बुंदेलखंड, ओरिसा आणि कर्नाटकात पसरली. त्या प्रदेशांमध्ये उपलब्ध असलेली ऐतिहासिक कागदपत्र व इतर साधनांमध्ये मराठा इतिहासाचे बरेच संदर्भ उपलब्ध आहेत. इतिहास विभागातील केंद्रांमध्ये मराठ्यांचा इतिहास, मराठी भाषा आणि संस्कृती तसेच दक्षिणी संस्थानाच्या इतिहासाच्या नोंदी असलेले ग्रंथ व कागदपत्रे आहेत. त्यामुळे मराठा इतिहास आणि मराठी भाषा व संस्कृती, दक्षिणी संस्थानांचा इतिहास शिवाजी विद्यापीठाच्या संशोधनाचे एक प्रमुख केंद्र आहे.
या केंद्रांतर्गत ऐतिहासिक घटनांवर संशोधन करण्याचा सातत्याने प्रयत्न केला जात आहे. याशिवाय मराठा इतिहासाबर अनेक कार्यशाळेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य तरुणांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला जातोय. मराठ्यांच्या इतिहासाशी संबंधित विषयांबर अनेक पीएच.डी. आणि एम.फिल. ये शोधप्रबंध पूर्ण झालेले आहेत. या केंद्राच्या माध्यमातून मराठा इतिहासाच्या विविध महत्वाच्या पैलूंचा उलगडा करण्याचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे.
विद्यापीठातील इतिहास विभागांतर्गत केंद्रामध्ये मराठा इतिहास कोश खंडामधील मराठा इतिहास विषयक नोंदीचे काम सुरु आहे. त्यामध्ये आवश्यक त्या बदलासह अद्ययावत नोंदी अभ्यासकांना ऑनलाईन उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. छत्रपती संभाजी महाराज यांच्या (तारीखवार, घटना) व्या नोंदी करून संदर्भग्रंथ तयार केला जाणार आहेत. तसेच काही लघु संशोधन प्रकल्प पूर्ण करण्याचे कामही सुरू आहे. मराठा इतिहासातील संशोधनाचे विविध पैलू नवीन पिढीपर्यंत पोहचवण्याचा दोन्ही अध्यासनाचा मानस आहे. त्यामुळे ज्यांना मराठ्यांचा इतिहास या विषयावर संशोधन करायचे आहे, त्यांनी येथील कागदपत्रांसह ग्रंथांचा अभ्यास करावा, असे आवाहनही संशोधन केंद्राच्या वतीने सातत्याने केले जात आहे.
- मराठा इतिहासाच्या संशोधनाला चालना
शिवाजी विद्यापीठात मराठ्यांचा इतिहास, मराठी भाषा आणि संस्कृती तसेच दक्षिणी संस्थानाच्या इतिहासाच्या संशोधनला चालना दिली जाते. विद्यापीठातील इतिहास अधिविभाग, छत्रपती शाहू महाराज मराठा इतिहास अध्ययन केंद्र, व छत्रपती संभाजी महाराज संशोधन केंद्रामार्फत मराठा इतिहासाच्या अनेक पैलूंवर नवीन प्रकाश टाकणारे संशोधन प्रकाशने प्रसिध्द केली आहेत. हे कार्य अविरतपणे सुरु आहे.
- डॉ. अयनीश पाटील (विभागप्रमुख, इतिहास अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ)
- संशोधनाचा दर्जा वाढला
संशोधन व शिक्षणावर विद्यापीठाचा दर्जा ठरत असतो. हा दर्जा वाढवण्यासाठी छत्रपती शाहू महाराज मराठा इतिहास अध्ययन केंद्राचे महत्वाचे योगदान आहे. विज्ञान शाखेप्रमाणे छत्रपती शाहू महाराज मराठा इतिहास अध्ययन केंद्राचे दर्जात्मक संशोधन भारतभर पोहचले आहे. मोडी लिपितील कागदपत्रांचा संशोधनामध्ये संदर्भ म्हणून बापर केला जात आहे. शिवाजी विद्यापीठाच्या यशात छत्रपती शाहू महाराज मराठा इतिहास अध्ययन केंद्र महत्वाचे स्थान आहे.