रेंट-अ-कारने तीन दुचाकींना ठोकरले
मांडवी पुलावरील घटना
प्रतिनिधी/ पणजी
येथील जुन्या मांडवी पुलावर झालेल्या अपघातात एका रेंट-अ-कारने तीन दुचाकींना ठोकरल्याची घटना घडली आहे. या अपघातात तिघेजण जखमी झाले आहेत. याबाबत पर्वरी पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला आणि जखमींना उपचारासाठी गोमेकॉत पाठविले. कार चालकाची म्हापसा जिल्हा इस्पितळात अल्कोहोल चाचणी घेण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जखमींमध्ये संदेश नाईक (पणजी), यश भुतानी (मूळ राजस्थान) व फारूख अन्सारी (पिळर्ण) यांचा समावेश आहे. हा अपघात शनिवारी पहाटेच्या सुमारास घडला आहे. युहान मॅथीव (शिवोली व मूळ दिल्ली) हा युवक जीए 03 डब्ल्यू 7918 क्रमांकाची रेंट-ए-कार आय 10 कार घेऊन पणजीहून पर्वरीच्या दिशेने जात होता. तर विरुद्ध दिशेने जीए 02 एडी 2032 या अॅक्टिवा स्कुटरवरून संदेश नाईक, जीए 03 एएन 4188 या ज्युपीटर स्कुटरवरून फारूख अन्सारी व आरजे 28 ईएस 1489 या बुलेटवरून यश भुतानी हे तिघे दुचाकीस्वार येत होते. कार चालक मांडवी जुन्या पुलावर मालिमच्या बाजूने पोहोचताच गाडीवरील नियंत्रण सुटले व चुकीच्या दिशेने जात प्रथम अॅक्टिवा व त्यानंतर इतर दुचाकींना कारची ठोकर दिली. या अपघातात तिघेही दुचाकीस्वार जखमी झाले. जखमींना 108 ऊग्णवाहिकेतून उपचारार्थ गोमेकॉत हलविण्यात आले. उपचारानंतर फारूख व यश यांना डिस्चार्ज देण्यात आला. तर संदेश नाईकवर उपचार सुरू आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल परब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.
राज्यात 1 ते 26 डिसेंबर 2024 या कालावधीत 204 अपघात झाले आहेत. यातील 14 भीषण अपघातांत 14 जणांना जीव गमवावा लागला. 44 अपघातांत 51 जणांना गंभीर दुखापत झाली. 54 किरकोळ अपघातांत 61 जणांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. याशिवाय 92 अपघातांत वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.