शाहूवाडीत आढळला दुर्मिळ पिवळ्या काटेसावरीचा वृक्ष
कोल्हापूर :
जैवविविधतेने समृद्ध असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील बजागेवाडी येथे दुर्मिळ पिवळ्या फुलांचा काटे सावरीचा फुललेला वृक्ष आढळून आल्याची माहिती, मलकापूर येथील प्रा. डॉ. एन. डी पाटील महाविद्यालयचे वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. मकरंद ऐतवडे आणि डॉ. पांडुरंग बागम यांनी दिली. अत्यंत दुर्मिळ असणाऱ्या या वृक्षाचे संवर्धन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
फेब्रुवारी ते मार्च महिन्यामध्ये काटेसावरीला लालसर गुलाबी फुले येतात. परंतु काही ठिकाणी संपूर्ण पिवळी फुलेही आढळून येतात. सन 1966 मध्ये सांतापाऊ या वनस्पती तज्ञांनी काटेसावरीचा संपूर्ण पिवळ्या रंगाची फुले देणारा वृक्ष पाहिल्याची शास्त्रीय नोंद आहे. तसेच डॉ. अलमेडा यांनी सिंधुदुर्ग जिह्यातील वनक्षेत्रात असे पिवळी फुले देणारे वृक्ष पाहिले आणि त्यानी अशा वृक्षांना बोम्ब्याक्स सीबा व्हरायटी ल्युटीया ( Bombax ceiba var.lutea ) असे शास्त्राrय नाव दिले. सन 1984 मध्ये डॉ. वर्तक व कुंभोजकर यांनी काटेसावरीचा पांढरी फुले असणारा वृक्ष पाहिल्याची नोंद आहे. वनस्पती तज्ञ डॉ. मधुकर बाचूळकर 2008 मध्ये चंदगड तालुक्यातील हुंदळेवाडी येथे संपूर्ण पिवळ्या रंगाची फुले असणारा काटेसावरचा वृक्ष आढळला होता. तसेच गगनबावडा रोडवर शेणेवाडी गाव परिसरात एकाच फांदीवर गुलाबी आणि पिवळी अशी दोन्ही प्रकारची फुले असलेला एकमेव दुर्मिळ वृक्ष नोंदवला आहे. त्यास रस्ते रुंदीकरण प्रकल्पात नष्ट होण्यापासून देखील वाचवले आहे.
वृक्षाबाबत अधिक माहिती देताना डॉ. ऐतवडे म्हणाले, झिंग आणि रेन या शास्त्रज्ञांनी संपूर्ण अभ्यास आणि निरीक्षणानंतर असा प्रस्ताव मांडला की पिवळी फुले विविध परागीभवन करणाऱ्या किटकांना आकर्षित करून परागीभवनाला चालना देतात आणि लालसर गुलाबी फुलांना मधमाश्यांच्या त्रासापासून वाचवतात.
काटेसावरचे वनस्पतीशास्त्राrय नाव बॉम्बॅक्स सीबा असून तो जास्वंद कुळातील वृक्ष आहे. बॉम्बॅक्स म्हणजे कापूस. सीबा हे जातीनाम दक्षिण अमेरिकेतल्या नावावरून तयार केले आहे. याला शाल्मली असे संस्कृत नावही आहे. हिंदीमध्ये त्याला सेमल किंवा रगतसेमल म्हणतात. इंग्रजीमध्ये रेड सिल्क कॉटन ट्री आणि रेड कपोक अशी नावे आहेत. भारताप्रमाणेच श्रीलंका, म्यानमार, दक्षिण अमेरिका, चीनच्या काही प्रदेशातील पानझडी जंगलात काटेसावर आढळतो. हा वृक्ष 15 ते 25 मीटर उंच वाढतो.
- काटेसावरचे विविध उपयोग पुढीलप्रमाणे :
- सावरीच्या डिंक हा मोचरस म्हणून ओळखला जातो. त्याचा उपयोग हा जुलाब, आव आणि रक्तस्रावामध्ये करतात.
- अर्श रोगात फुले, खसखस, साखर आणि दूध याबरोबर देतात.
- पानाचा लेप सुजलेल्या गाठीवर लावतात.
- प्लिहा रोगामध्ये फुलांचा काढा रात्री तयार करून ठेवावा आणि सकाळी मोहरीचे चूर्ण घालून द्यावा.
- कोवळी फळे उत्तेजक, मूत्रजनक आहेत.
- सावरीच्या कापूस जो शेवरीच्या कापूस म्हणूनही ओळखला जातो. हा कापूस गाड्या उशांमध्ये भरण्यासाठी उत्तम समाजाला जातो. सिमला या नावाने तो युरोपातही निर्यात केला जातो.
- याच्या बिया (सरकी) गुरांना खायला देतात. आदिवासी भागात फुले आणि कळ्यांची भाजी करून खातात.
- सावरीच लाकूड हलकं, मऊ, आणि कुजणारा असल्यामुळे त्याचा उपयोग प्लायवूड, चहाची खोकी, पादत्रानांच्या उंच टाचा बनविण्यासाठी करतात.
- कागदाचा लगदा हा वृत्तपत्रासाठी चांगला समाजाला जातो.
- अंतर्सालीचा उपयोग दोरखंड करण्यासाठी होतो.
शाहुवाडी तालुका हा जैविविधतेने समृद्ध असून अनेक नवीन वनस्पतींचा शोध या भागातून लागलेला आहे. पिवळ्या फुलांच्या काटेसावरीचा एकमेव वृक्ष आम्हाला शाहुवाडी तालुक्यात मिळाला आहे. त्याच्या जतन आणि संवर्धनासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. यासाठी प्रशासनानेही पुढाकार घेणे गरजेचे आहे. तसेच या अस्सल देशी वृक्षाला हेरीटेज अर्थात वारसा वृक्षाचा दर्जा मिळणे आवश्यक आहे.
- डॉ. मकरंद ऐतवडे, वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख