Bicycle Special Story | तुझी वस्तू काय आभाळातून पडली काय?'; कोल्हापुरात टोमणा नव्हे, खरोखरच आकाशातून उतरते 'ही' सायकल!
कोल्हापुरात जपलीय आभाळातून पडणारी दुर्मिळ सायकल!
कोल्हापुर ( सुधाकर काशिद ) -एखाद्या वस्तूचे एखादा माणूस बारंबार कौतुक करू लागला की, 'तुझी वस्तू काय आभाळातून पडली आहे काय?" असा टोमणा कोल्हापुरात हमखास ठरलेला आहे. पण कोल्हापुरात खरोखरच एक वस्तू आभाळातून पडणारी आहे. पटणार नाही ही वस्तू म्हणजे चक्क एक सायकल आहे. ही सायकल साधीसुधी नव्हे तर दुसऱ्या महायुद्धात पॅराशुटमधून जमिनीवर उतरताना सैनिकांनी वापरलेली आहे. कोल्हापुरातल्या रवी आणि पिंटू घाटगे या बंधूकडे ही सायकल आहे. त्यांनी अगदी मनापासून ही सायकल जपली आहे. आज सायकल दिनाच्या निमित्ताने तर त्यांनी ही सायकल खरोखर हळद-कुंकू लावून पुजली आहे.
एका बाजूला बदलत्या काळात लाख-लाख रुपयाच्या सायकलीबाजारात आल्या आहेत. इलेक्ट्रिक सायकल इतर प्राधान्याने वापरली जात आहे. पॅडल मारून पाय थकले की बटन दाबून ही सायकल विजेच्या वेगाने पळवायला सोपी आहे. सायकलचा व्यायाम तर एक वेगळे स्टेटस ठरत आहे. या पार्श्वभूमीवर पॅराशुटमधून उतरणाऱ्या सैनिकांसाठीच असलेली दुसऱ्या महायुद्धातली (१९४२) एक सायकल कोल्हापुरात खरोखरच कुतुहालाची आणि वेगळेपणाची निशाणी ठरली आहे. ही सायकल अगदी सहज दुमडता येणारी आहे. ही सायकल बनवण्यासाठी वापरलेला अल्युमिनियम धातू बजनाला हलका पण एका माणसाचे वजन पेलायच्या ताकदीचे आहे. ज्यावेळी सैनिकांची तुकडी एखाद्या अपरिचित भागात हवाई मार्गाने पॅराशुटचा वापर करून उतरते तेव्हा त्यांच्या पाठीवरील सॅकमध्ये ही सायकल दुमडून अगदी व्यवस्थित अडकवलेलीअसते.
जमिनीवर उतरल्यानंतर ही सायकल उलगडून त्याच्यावरून सैनिकांना अगदी फार मोठे अंतर नाही पण आवश्यक तितके अंतर पार करता येणे शक्य असते. दुसऱ्या महायुद्धात या खास युद्धासाठीच्या सायकलींचा बापर झाला. ही सायकल रात्रीचालवायची वेळ आली तर पुढे छोटा दिवा, त्याचा प्रकाश फक्त चाकापुरता पडतो अशा रचनेचा आहे. या सायकलीला बॉटर बॅग अडकवण्याची सोय आहे. याशिवाय अगदी छोटा स्टोव्ह आणि दुर्बीण अडकवण्याची सोयही आहे.
दोन टोकाच्या दोन सायकली...
वेगवेगळ्या कंपन्यांच्या विविध वैशिष्ट्ये असलेल्या सायकली आहेत. त्यात इलेक्ट्रिक सायकलींची संख्या अधिक आहे. त्याच जोडीला कोल्हापुरात ही आकाशातून पडणारी सायकल आहे. वोन टोकाच्या या दोन सायकली घाटगे बंधूंनी जपल्या आहेत.