ऑस्ट्रेलिया-द.आफ्रिका सामन्यात आज धावांची बरसात अपेक्षित
वृत्तसंस्था/ रावळपिंडी
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका हे भरपूर लढाऊ शक्ती असलेले दोन संघ आज मंगळवारी येथे होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यात भिडणार असून यावेळी ते एकमेकांना मागे टाकून उपांत्य फेरीत एक पाऊल टाकण्याचा प्रयत्न करतील. ताकद कमी झालेल्या ऑस्ट्रेलियाला स्पर्धेपूर्वी फारसे कोणी संधी देण्यास तयार नव्हते. पण लाहोरमधील इंग्लंडविऊद्धच्या लक्ष्याच्या यशस्वी पाठलागाने आयसीसी स्पर्धांमध्ये उसळी घेण्याची त्यांची प्रवृत्ती पुन्हा एकदा दाखवून दिली आहे.
लाहोरमध्ये रात्री पडलेल्या दवाने आपली भूमिका व्यवस्थित बजावली आणि रावळपिंडीमध्ये लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाला तो पुन्हा एकदा मदतकारी ठरू शकतो. ऑस्ट्रेलियाला स्पर्धेत पॅट कमिन्स, मिशेल स्टार्क आणि जोश हेझलवूड या वेगवान त्रिकुटाची उणीव भासेल हे स्पष्ट आहे. पण किमान पहिल्या सामन्यात तरी धाडसी फलंदाजीने त्यांच्या अनुपस्थितीची भरपाई केली. जीवनातील सर्वोत्तम खेळी केल्याने जोश इंग्लिसचा आत्मविश्वास कमालीचा उंचावला असेल. याशिवाय मॅथ्यू शॉर्ट, मार्नस लाबुशेन, अॅलेक्स केरी आणि ग्लेन मॅक्सवेल यांनीही त्या सामन्यात चांगले योगदान दिले.
फलंदाजीत फक्त कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि सलामीवीर ट्रॅव्हिस हेड चांगली कामगिरी करू शकले नाहीत. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिकेविऊद्ध मोठी धावसंख्या उभारू शकतो. डावखुरा वेगवान गोलंदाज स्पेन्सर जॉन्सन आणि मॅक्सवेलकडूनही यावेळी चांगल्या गोलंदाजीची अपेक्षा असेल. कारण इंग्लंडविरुद्ध मॅक्सवेल खूप महागडा ठरला. सहाव्या गोलंदाजाची जबाबदारी लाबुशेन आणि शॉर्ट यांना मिळून उचलावी लागण्याची शक्यता आहे.
इंग्लिसप्रमाणेच दक्षिण आफ्रिकेच्या ड्रेसिंग रूममधील रायन रिकेल्टनचा आत्मविश्वास अफगाणिस्तानविऊद्ध आक्रमक शतक झळकावल्यानंतर वाढलेला असेल. तिसऱ्या, चौथ्या व पाचव्या क्रमांकावरील फलंदाजांनी अर्धशतके फटकावणे ही टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखालील संघाच्या दृष्टीने चांगली लक्षणे आहेत. दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेचा हेनरिक क्लासेन मागील सामन्यात खेळू शकला नाही आणि आजच्या सामन्यातील त्याचा सहभागही निश्चित नाही. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान मारा ऑस्ट्रेलियापेक्षा मजबूत असून कागिसो रबाडा त्याचे नेतृत्व करेल. पहिल्या पसंतीचे खेळाडू उपलब्ध नसल्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दक्षिण आफ्रिकेची तयारी ही काही सर्वोत्तम अशी राहिली नव्हती. असे असले, तरी ते सर्वतोपरी प्रयत्न करण्यास सज्ज झालेले आहेत.
संघ : ऑस्ट्रेलिया-स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, ट्रॅव्हिस हेड, मार्नस लाबुशेन, जोश इंग्लिस, अॅलेक्स केरी, ग्लेरी मॅक्सवेल, बेन द्वारशुइस, नॅथन एलिस, अॅडम झाम्पा, स्पेन्सर जॉन्सन, जेक फ्रेझर-मॅकगर्क, आरोन हार्डी, शॉन अॅबॉट, तन्वीर सांघा.
दक्षिण आफ्रिका-टेम्बा बावुमा (कर्णधार), रायन रिकेल्टन, टोनी डी झॉर्जी, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, एडेन मार्करम, डेव्हिड मिलर, वियान मुल्डर, मार्को जेनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी, हेनरिक क्लासेन, तबरेज शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, कोरिन बॉश.
सामन्याची वेळ : दुपारी 2.30 वा.