कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

एक फुंकर... सांगते रक्तातली साखर

06:08 AM Jan 19, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सध्या मधुमेह किंवा डायबेटिस या विकाराने भारतात धुमाकूळ घातला आहे. किमान 20 कोटी लोकांना या विकाराने ग्रासले आहे, असे तज्ञांचे म्हणणे आहे. ज्यांना आपल्याला हा विकार झाला आहे, हे माहीत आहे, त्यांची ही संख्या आहे. आणखी 10 कोटी लोक असे असू शकतील की ज्यांना मधुमेह असल्याचे माहितही नाही. या स्थितीमुळे रक्तातले साखरेचे प्रमाण नेहमी तपासत राहणे, हा अनेकांचा नित्यक्रम बनला आहे. आज बाजारात साखरेचे प्रमाण दर्शविणारी अनेक साधने उपलब्ध आहेत, ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणता येईल.

Advertisement

Advertisement

या साधनांमध्ये लवकरच एका अत्यंत सुलभ, स्वस्त आणि सोयीच्या साधनाची भर पडण्याची शक्यता आहे. सध्या उपलब्ध असणारी साधने उपयोगात आणण्यासाठी आधी आपल्याला बोटाला सुयी टोचून रक्त काढावे लागते. मात्र, या नव्या साधनात तसे करण्याची आवश्यकता नाही. या साधनाच्या विशिष्ट उपकरणात आपण एक फुंकर मारली, की हे यंत्र रक्तातील साखरेची पातळी दर्शविते, असे त्याच्या निर्मात्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे हे यंत्र तुमच्या अंगातील रक्त न काढता, त्या रक्तात किती साखर आहे, हे दर्शविणार आहे.

बालाघाट येथील प्रधानमंत्री महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपल्या प्राध्यापकांच्या साहाय्याने या यंत्राची निर्मिती केली आहे. या यंत्राचे सादरीकरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोरही झाले असून त्यांनी या यंत्राचे तोंड भरुन कौतुक केले आहे. या यंत्राचे सादरीकरण करणारी विद्यार्थिनी पल्लवी ऐडे हिच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या यंत्राची माहिती जाणून घेतली आणि या यंत्राची प्रशंसा केली. साखर समजण्यासाठी शरीरातील रक्त काढावे लागू नये, ही या यंत्राची मूळ संकल्पना आहे. बहुतेक मधुमेही रुग्णांमध्ये किटोजेनिक मेटाबोलिझम नावाचा एक दोष निर्माण झालेला असतो. रक्तात किटोनच्या निर्मितीला प्रारंभ झाला, की आपल्या उच्छ्वासाला (नाकातून किंवा तोंडातून बाहेर सोडलेल्या वायूला) अॅसिटोन या रासायनिक  द्रव्याचा वास येतो. हा वास किती तीव्रतेचा आहे, हे समजल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण किती आहे, हे अचूकरित्या समजू शकते. हेच तत्व या यंत्रात उपयोगात आणले गेले आहे. त्यामुळे या यंत्रात फुंकर मारली की त्वरित रक्तातल्या साखरेची पातळी समजते, असे या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. अर्थातच हे यंत्र अद्याप व्यापारी निर्मितीच्या पातळीवर पोहचलेले नसले, तरी नजीकच्या भविष्यात ते सर्वसामान्यांना उपलब्ध होऊ शकेल आणि ‘अहिंसक’ मार्गाने रक्तातल्या साखरेचा हिशेब प्रत्येकाला ठेवता येईल, अशी शक्यता आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article