आश्वासक दौरा
शिरोभाग : अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबियो यांच्या तीन दिवसांच्या भारत दौऱ्यात व्यापार कराराच्या दृष्टीने सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे दिसते. भारताच्या दहशतवादविषयक भूमिकेलाही अमेरिकेचे समर्थन असल्याचे दिसून येते. त्यामुळे दौरा दिलासादायक होता, असे सध्यातरी दिसते.
अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबियो यांचा तीन दिवसांचा भारत दौरा पार पडला आहे. या दौऱ्यात त्यांनी भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांच्याशी भारत-अमेरिका सहकार्याशी संबंधित अनेक विषयांवर व्यापक चर्चा केली, असे स्पष्ट करण्यात आले आहे. व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, संरक्षण आदी विषयांचा चर्चेत समावेश होता. भारत आणि अमेरिका यांच्यातील प्रस्तावित व्यापार करार या ना त्या कारणांमुळे रखडला आहे. तो पुढील काही महिन्यांमध्ये नव्हे, तर आठवड्यांमध्ये पूर्ण होईल, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनीही हा करार होणार असून तो अमेरिकेने अन्य देशांशी केलेल्या करारांपेक्षा काही प्रमाणात भिन्न असेल, असे सूचक विधान याचवेळेला केलेले आहे. या घडामोडींवरुन हा करार लवकर होण्याची शक्यता बळावल्याचे दिसून येते. त्याचप्रमाणे भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान यांनी स्थापन केलेल्या ‘क्वाड’ या संघटनेचेही पुनरुज्जीवन करण्यात येईल. या संघटनेच्या चारही सदस्यांची पूर्ण बैठक गेली दोन वर्षे झालेली नाही. कारण, अमेरिकेने या संघटनेत पूर्वीइतके स्वारस्य दाखविणे मध्यंतरीच्या काळात बंद केले होते. त्यामुळे ही संघटना केवळ नावापुरतीच राहणार का, असा प्रश्न निर्माण झाला. तथापि, येत्या नोव्हेंबरमध्ये फिलिपाईन्सची राजधानी मनिला येथे ही बैठक होईल, अशी घोषणा रुबियो यांनी केल्याने काही बाबी पुन्हा पूर्वपदावर येत असल्याचे दिसून येते. भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार करार होणे, हे महत्त्वाचे आहे. कारण, आजही भारताची सर्वाधिक निर्यात अमेरिकेला होते. ती औषधांपासून यंत्रांच्या सुट्या भागांपर्यंत विविध प्रकारची आहे. या निर्यातीवर भारतातील आणि अमेरिकेतीलही अनेक उद्योगांचे आणि उद्योजकांचे भवितव्य अवलंबून आहे. गेल्या साधारणत: दीड वर्षांमध्ये भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी संबंध ताणले गेलेले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या दुसऱ्या कालावधीत अमेरिकेचे व्यापार शुल्क धोरण आणि स्थलांतरितांविषयीचे धोरण परिवर्तीत झाल्याने दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये एक प्रकारची अस्थिरता निर्माण झाली आहे. यांपैकी स्थलांतरितांसंबंधीचे नवे धोरण अमेरिका सोडणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भारतातील उच्चशिक्षित तंत्रज्ञांसाठी अमेरिका हे महत्त्वाचे आणि विश्वासार्ह निर्गमन स्थळ होते, तशी परिस्थिती आता राहिली नाही. भारताला या स्थितीशी जुळवून घेणे भाग आहे. तथापि, व्यापारविषयक अडचणी दूर झाल्यास दोन्ही देशांमधील आर्थिक तणाव दूर होऊ शकतो. रुबियो यांच्या या दौऱ्यातून त्यासंबंधीचे सकारात्मक संकेत मिळालेले आहेत. पाकिस्तान समर्थित दहशतवाद हा भारतासाठी महत्त्वाचा आणि संवेदनशील मुद्दा नेहमीच राहिलेला आहे. तथापि, अध्यक्ष ट्रंप यांच्या दुसऱ्या कार्यकाळात भारताची ही संवेदनशीलता अमेरिकेने दुर्लक्षित केली असल्याचे पहावयास मिळत होते. तथापि, रुबियो यांनी स्पष्टपणे दहशतवादाच्या विरोधातील भारताच्या भूमिकेचे समर्थन केले. तसेच, अमेरिकेचे पाकिस्तानशी संबंध मित्रत्वाचे असले, तरी दहशतवादाच्या संबंधात भारताला अमेरिकेचे समर्थन आहे, हे त्यांच्या वक्तव्यातून जाणवले आहे. ही भारतासाठी निश्चितच समाधानाची बाब आहे. सध्या अमेरिकेला तेथील लोकप्रतिनिधीगृहांच्या निवडणुकांचे (मिड टर्म) वेध लागले आहेत. येत्या 10-12 दिवसांमध्ये तेथे मतदान आहे. या निवडणुकांमध्ये कोणाची सरशी होणार, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. कारण या निवडणुकांचे परिणाम अध्यक्ष ट्रंप यांच्या धोरणावर होतील, असे मानले जाते. त्यामुळे त्यांनीही सध्या सावध भूमिका घेतल्याचे दिसते. अमेरिकेत पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ झाली असून त्यामुळे रशियाकडून डिझेल आयात करण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला. तसेच युक्रेन युद्धामुळे रशियावर लादण्यात आलेले तेलविक्री निर्बंध अमेरिकेने 2 महिन्यांसाठी हटविले. या निर्णयाचा भारतालाही लाभ मिळाला. कारण, भारताने मोठ्या प्रमाणावर रशियाकडून तेल खरेदी केल्यास अमेरिकेचा विरोध निदान दोन महिने तरी राहणार नाही. या दोन महिन्यांमध्ये भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार करार झाल्यास भविष्यकाळातील ऊर्जा आणि इंधन धोरणाची दिशा स्पष्ट होईल. परिणामी, भारताच्या अमेरिकेला होणाऱ्या निर्यातीवर 100 टक्के व्यापार शुल्क लागू होण्याची शक्यता कदाचित दूर होऊ शकते. अर्थात, सध्यातरी या सर्व शक्यता आहेत. पण अमेरिकेच्या भारताविषयीच्या धोरणात परिवर्तन होत असून, दोन्ही देशांमधील संबंध पूर्ववत होण्याची शक्यता आहे, इतपत संकेत रुबियो यांच्या या दौऱ्यातून मिळाले आहेत, असे म्हणता येते. प्राप्त परिस्थितीत ही बाबही सकारात्मकच मानावी लागेल. येत्या काही आठवड्यांमध्ये चित्र स्पष्ट होईलच. रुबियो यांच्या याच दौऱ्यात भारत, अमेरिका आणि संयुक्त अरब अमिरात यांची त्रिपक्षीय बैठक पार पडली. ती ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. एकंदरीत, या दौऱ्याची सकारात्मकता गेल्या दोन वर्षांमधील दौऱ्यांपेक्षा अधिक आहे, असे म्हणता येईल.
