स्नूकरमधील महाराष्ट्रातील आशादायी खेळाडू : पीयूष लिंबड
अनेक आंतरराज्य, राष्ट्रीय स्पर्धां गाजवल्या, स्नूकरच्या प्रसारासाठी कोल्हापुरात अॅकॅडमी केली स्थापन, पन्नासावर खेळाडू घडवले
वडील प्रवीणकुमार लिंबड यांचा टेलरिंगचा व्यवसाय. तर मुलगा पीयूष हा वडिलांना व्यवसायात मदत करत आणि महाविद्यालयीन शिक्षण घेत मित्रमंडळींसोबत स्नूकर खेळत होता. आणि स्नूकर खेळ पुढे आपली पीयूष यांची लाईफ बनला. अखंडित सरावाच्या जोरावर त्यांनी स्थानिक पासून ते राष्ट्रीय स्नूकर स्पर्धांपर्यंत मजल मारत अनेक स्पर्धा जिंकल्या गाजवल्या आहेत. या कामगिरीमुळेच त्यांना महाराष्ट्रातील काही निवडक पण दर्जेदार स्नूकरपटूंच्या यादीत स्थान मिळालेले आहे. पीयूष हे सध्या स्नूकरपटू घडवण्याबरोबरच एक स्पर्धक म्हणूनही कार्यरत आहे.
मुळात स्नूकर हा खेळ स्टॅंडर्ड लोकांचा मानला जातो. स्नूकर टेबलवर अत्याधुनिक लाकडी क्यु-स्टिक व बॉलच्या साह्याने खेळला जाणारा स्नूकर हा खेळ ज्याच्याकडे संयम, एकाग्रता आणि शांतपणा आहे त्यांनीच खेळावा असं जनरली बोलले जाते. ज्याच्याकडे या तीनही गोष्टी नाहीत त्याने स्नूकरची क्यु-स्टिक हातात धरू नये असेही मिश्किल पणे म्हटले जाते. हा खेळ संयमाने आणि शांत डोक्याने जो खेळतो तोच विजयाच्या समिपही जातो. इतकेच नव्हे तर स्नूकर खेळणाऱ्या माणसाकडे एखाद्या शार्पशूटरसारखी नजर असावी लागते. ज्याच्याकडे उत्तम नजर आहे तोच स्नूकर टेबलवरील लालरंगाचे बॉल क्यु-स्टिकच्या सहाय्याने अगदी सफाईदारपणे पॉकेटमध्ये मारू शकतो.
स्नूकरसाठीचे एकाग्रता, संयम आणि शांतपणा हे तिन्ही गुण कोल्हापुरातील पीयूष लिंबड यांच्यामध्ये होते. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते सांगलीतील आयटीआयमध्ये पॅटर्न मेकर हा कोर्स करत होते. कोल्हापूरात रोजचे कोर्सचे वर्ग अटेंड केल्यानंतर ते थेट कोल्हापुरात येऊन मंडळीसोबत राजारामपुरीतील स्नूकर क्लबवर स्नूकर खेळायलाही जात असत. जन्मजातच शांत स्वभाव लाभलेले पीयूष यांना रोजच्या सरावाने स्नूकरची आवड लागली. आणि हीच आवड पीयूष यांच्या जीवनाचा एक घटक बनून गेली. स्नूकरमधील बारकावे शिकत अधिक चांगल्या पद्धतीने स्नूकर कसे खेळता येईल याचा संकेतस्थळांद्वारे सेल्फ स्टडी करत सरावात झोकून दिले.
राज्यपातळीवर स्नूकर स्पर्धा 5 ते 7, राष्ट्रीय पातळीवर 7 ते 9 आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर 9 ते 35 फ्रेममध्ये आयोजित केल्या जातात. स्पर्धेत जो जास्ती फ्रेम जिंकतो तो विजयी ठरतो. फ्रेमनुसार अडीच तासांपासून ते अगदी दोन दिवस स्पर्धेतील एक सामना सुऊ राहतो. याचाही अभ्यास कऊन पीयूष यांनी सामना रोज चार ते सात तास सराव करण्यावर भर दिला. आपण चांगल्या पद्धतीने स्नूकर खेळू शकतो याची जाणीव झाल्यानंतर त्यांनी स्पर्धेत प्रतिनिधित्व करण्यास सुरुवात केली. बेळगाव येथे झालेल्या स्पर्धेत विजेतेपद मिळवण्यात अपयश आले. परंतु हिम्मत न हारता पीयूष यांनी स्नूकरचा सराव सुरूच ठेवला.
या सरावाच्या जोरावर 2024 सालापर्यत सांगली, सातारा, पुणे, मुंबई, बेळगाव, हुबळी, धारवाड, दक्षिण कर्नाटकातील गंगावती, चेन्नई, इंदोर, सुरत, अहमदाबाद येथे हो राहिलेल्या आंतरजिल्हा, आंतरराज्य स्नूकर स्पर्धांमध्ये प्रतिनिधित्व केले. सांगलीतील स्पर्धेत उपविजेतेपद मिळाले तर सातारा, बेळगाव येथील स्पर्धांमध्ये उपांत्य फेरीपर्यत मजल मारली. पण तयांना विजेतेपद मिळाले नाही. आपल्याला विजेतेपद मिळत नाही म्हणून त्यांनी स्वत:ला स्नूकरपासून दूर ठेवले नाही, उलट जोमाने सराव सुरूच ठेवला. वडीलांना टेलरिंग व्यवसायात मदत करत करत स्नूकरचा सराव करणे असे सोपे नव्हते. परंतु पीयूष यांनी टेलरिंग आणि सराव याचे योग्य नियोजन करून स्पर्धांमध्ये सहभागी होणे सुरूच ठेवले.
स्नूकर अकॅडमीची स्थापना...
कुस्ती, फुटबॉल आणि क्रिकेटचे जास्ती वेढ असलेल्या कोल्हापुरात 1998-99 च्या कालावधीत राजारामपुरीसह अन्य ठिकाणी 20 ते 22 स्नूकर क्लब होते. या क्लबमध्ये त्या काळातील अनेक उच्च वर्गातील तरुण व नागरिक स्नूकर खेळायला जात होते. परंतू कालांतराने बहुतांश क्लब विविध कारणांनी बंद पडत गेले. जे क्लब सुरू राहिले तिथे जाऊन पीयूष यांनी स्नूकरचा सराव सुरु ठेवला. कालांतराने जे क्लब होते तेही बंद पडले. त्यामुळे पीयूष यांनी पुढाकार घेऊन खंडित होत चाललेली कोल्हापुरातील स्नूकर क्लबची परंपरा पुन्हा सुरू करण्यासाठी पाऊले उचलली.
स्वत:ची अॅकॅडमी केली स्थापन...
काही कारणास्तव अमेय व पीयूष या दोघांनी राजारामपुरीतील स्नूकर अॅकॅडमीच्या पार्टनरशिपमधून विभक्त झाले. अमेय यांनी शिवाजी उद्यमनगरातील एसबीआय बँकेजवळ आपली स्वत:ची स्नूकर अॅकॅडमी सुरू केली. पीयूष यांनीही स्नूकर अॅकॅडमी स्थापन केली. रेडझ् स्नूकर अॅकॅडमी असे अॅकॅडमीचे नामकरणही केले. राजारामपुरी चौथ्या गल्लीत स्थापलेल्या या अॅकॅडमीत पीयूष यांनी काही लाख रुपयांच्या घरात पैसे मोजून दोन आधुनिक बनावटीचे स्नूकर टेबल मांडले. ह्या बोर्डवर ते स्नूकरचा सराव करत तरुणांना प्रशिक्षण ही देऊ लागले. आजवर त्यांनी 60 ते 70 स्नूकरपटू तयार केले असून तेही राज्य व आंतरराज्य स्पर्धेत सहभागी होत आहेत.
2022 साली बेळगाव येथे आयोजित आंतर राज्य स्नूकर स्पर्धेत पीयूष यांनी संयमाचा जोरावर अंतिम फेरीत धडक दिली होती. परंतु अंतिम फेरीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. 2023 साली इंदोर बिलिर्यड्स् अँड स्नूकर फेडरेशन ऑफ इंडिया व भारतीय खेल प्राधिकरण यांच्यावतीने आयोजित राष्ट्रीय मास्टर्स स्नूकर स्पर्धेच्या 40 वर्षावरील गटात टॉप 32 मध्ये स्थान मिळवले. 2022 मध्ये बेळगाव येथेच आंतर राज्यस्तरावर आयोजित केलेल्या झिरो प्लस वन स्नूकर स्पर्धेत हुबळीचे अँड्रीन मोजेस यांना 4-2 असे हरवून विजेतेपदही पटकावले. हुबळी येथे अखिल भारतीय खुल्या सिक्स रेड स्नूकर स्पर्धेतही पीयूष यांना अंतिम फेरीत दर्जेदार स्नूकरपटू चेन्नईचे पांडुरंगैया यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. बक्षीस वितरण समारंभात उपविजेतेपदाबद्दल पीयूष यांना 7 हजार रुपये व चषक देऊन गौरवले होते.
2024 साली सांगलीतील ग्रीन बेज स्नूकर अॅकॅडमीत झालेल्या आंतरराज्य स्नूकर स्पर्धेतही पीयूष यांनी उपविजेतेपद पटकावून महाराष्ट्रात आपला दबदबा निर्माण केला होता. त्यांनी स्पर्धेतील अंतिम फेरीपर्यंत मजल मारण्यासाठी अव्वल 6 स्नूकरपटूंना हरविले होते. मार्च 2025 मध्ये गोवा येथे बिलिर्यड्स् अँड स्नूकर फेडरेशन आँफ इंडिया व भारतीय खेल प्राधिकरण यांच्यावतीने आयोजित राष्ट्रीय मास्टर्स स्नूकर स्पर्धेच्या 40 वर्षावरील गटातील स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. मात्र उपांत्यपूर्व फेरीत पीयूष यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. परंतु बक्षीस वितरण समारंभात त्यांच्या उत्कृष्ट खेळाचा सन्मान म्हणून क्वार्टरफायनलीस्ट ट्रॉफी देऊन त्यांना गौरवले. याशिवाय कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, बेळगाव, लातूर येथे झालेल्या आंतरराज्य स्पर्धेतही पीयूष यांना उपविजेतेपदच मिळत राहिले.
26 स्पर्धांचे आयोजन
कोल्हापुरात तऊणाई स्नूकर खेळाचा प्रचार व प्रसार व्हावा म्हणून गेल्या 9 वर्षात तब्बल 26 स्पर्धा जिल्हा, आंतरजिल्हा व आंतरराज्य अशा तिनही पातळीवर आयोजित केल्या. या स्पर्धामधून कोल्हापुरी जिह्यासह सांगली, सातारा, रत्नागिरी, सोलापूर, पुणे, मुंबई, बेळगाव, हुबळी, धारवाड, मध्यप्रदेश, गुजरात, चेन्नई येथील शेकडो स्नूकरपटूंनी प्रतिनिधीत्व केले. स्नूकर खेळाला फारसा लोकाश्रय नाही. फुटबॉल व क्रिकेटवेड्या कोल्हापूरात स्पर्धांसाठी मोठे बक्षीस देणारा स्पॉन्सरर मिळत नाही. त्यामुळे स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांकडून घेतल्या जाणाऱ्या प्रवेश शुल्कातूनच स्पर्धेतील यशस्वी स्नूकरपटूंना रोख रकमेची बक्षीसे द्यावी लागतात. एप्रिल अथवा मे महिन्यात राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करणार आहे. त्यासाठी स्पॉन्सरर शोधत आहे, असे पीयूष लिंबड यांनी सांगितले.
-संग्राम काटकर