कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

खासगी आराम बस जळून खाक

10:40 AM Aug 25, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

खेड :

Advertisement

बोरीवली-मुंबई येथून मालवणला जाणाऱ्या विक्रोळी-मुंबईतील सिद्धकला ट्रॅव्हल्सच्या खासगी आराम बस टायर फुटून पेटली. चालकाच्या प्रसंगावधानाने सुदैवाने 44 प्रवासी बचावले असले तरी बससह गणेशभक्तांचे साहित्य भस्मसात झाले.

Advertisement

ही घटना शनिवारी मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास कशेडी बोगद्याजवळील भोगाव-पोलादपूरनजीक घडली. बसच्या बर्निंग थरारानंतर महामार्गही काहीकाळ थबकला. 27 ऑगस्टपासून गणेशोत्सवाची धामधूम सुरू होणार आहे. यामुळे महामार्ग गणेशभक्तांच्या रेलचेलीने गजबजला आहे. कशेडी बोगद्याजवळील भोगावनजीक खासगी आराम बस जळून खाक झाल्याने गावी येणाऱ्या गणेशभक्तांच्या मार्गात पहिल्याच दिवशी ‘विघ्न’ ठाकले. मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या घटनेने महामार्ग वाहतूक पोलिसांसह पोलादपूर पोलीस व स्थानिक मदतकर्त्यांची तारांबळ उडाली.

चालक सचिन रघुनाथ लोके (37, रा. खार - मुंबई) हा एमएच 02 एफजी 2121 क्रमांकाच्या खासगी आराम बसमधून गणेशभक्तांना घेऊन मालवणला येत होता. बस कशेडी बोगद्याजवळ आली असता अचानक बसचा टायर फुटून स्फोट झाला. चालकाने प्रसंगावधान राखत बस रस्त्यालगत थांबवत सर्व प्रवाशांना सुखरूप खाली उतरवले. काही क्षणातच बसने पेट घेत होत्याचे नव्हते झाले. बस बेचिराख झाली तर गावी येणाऱ्या गणेशभक्तांचे सर्व साहित्य आगीच्या भक्षस्थानी सापडले.

बसला आग लागल्याची माहिती मिळताच येथील नगर परिषदेच्या अग्निशामक दलातील फायरमन शाम देवळेकर, दीपक देवळेकर, वाहन चालक गजानन जाधव, सहाय्यक फायरमन जयेश पवार, प्रणय रसाळ, सुरज शिगवण यांच्यासह मदत ग्रुपचे अध्यक्ष प्रसाद गांधी व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. पोलादपूर पोलीस ठाण्याचे पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदा रावडे, पोलीस उपनिरीक्षक पवार व सहकाऱ्यांनी तसेच कशेडी येथील वाहतूक पोलीस मदत केंद्राच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून मदतकार्य हाती घेतले.

तब्बल 3 तासांच्या अथक प्रयत्नाने बसला लागलेली आग आटोक्यात आणण्यात यश आले. मात्र, आगीचा आगडोंब उसळल्याने बस पूर्णपणे भस्मसात झाली. ही बस ओमकार मागले यांच्या मालकीची असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातानंतर महामार्गावरील वाहतुकीचा खोळंबा होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. बसला लागलेली आग पूर्णपणे नियंत्रणात आल्यानंतर बसमधील प्रवाशांची अन्य बसफेरीद्वारे इच्छितस्थळी पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात आली.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article