व्हॉट्सअॅपवरील चेष्टा विद्यार्थिनीच्या अंगलट
वृत्तसंस्था/ ह्युस्टन
फ्लोरिडाच्या एका विद्यापीठाच्या विद्यार्थिनीला अटक करत तुरुंगात पाठविण्यात आले आहे. या विद्यार्थिनीने कथित स्वरुपात एका व्हॉट्सअॅप ग्रूप चॅटमध्ये एक मेसेज पोस्ट केला होता, ज्यात तिने इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांना स्वत:च्या कॉलेजवर ‘बॉम्ब टाकण्याचे’ आवाहन केले होते.
ही केवळ चेष्टा होती, असे विद्यार्थिनीने अधिकाऱ्यांना सांगितले, परंतु अधिकाऱ्यांनी याला धमकी मानत कारवाई केली आहे. 23 वर्षीय विद्यार्थिनी गॅब्रिएला सल्डानाने जवळपास 215 विद्यार्थ्यांच्या एका व्हॉट्सअॅप ग्रूप चॅटमध्ये हा मेसेज केला होता. तर या ग्रूपवर विद्यार्थी विद्यापीठात आयोजित होणाऱ्या एका कार्यक्रमाबद्दल चर्चा करत होते.
गॅब्रिएलाने एका कार्यक्रमासंबंधी व्हॉट्सअप ग्रूप चॅटद्वारे लोकांना जीवे मारण्याची किंवा शारीरिक नुकसान पोहोचविण्याची धमकी दिली होती असे पोलिसांनी नोंदविलेल्या गुन्ह्यात नमूद आहे. ‘नेतान्याहू तुम्ही कृपया एफआययूवर बॉम्ब पाडवू शकता का? पुढील आठवड्यात परीक्षा होणार आहे आणि माझी तयारी झालेली नाही’ असे गॅब्रिएलाने स्वत:च्या संदेशात म्हटले होते.
गॅब्रिएलाने चेष्टा केली हे मी समजू शकते, परंतु एखाद्या निष्पक्ष व्यक्तीसाठी ही चेष्टा नसेल आणि हे संभाव्य कारणासाठी पुरेसे असेल असे उद्गार न्यायाधीश मिंडी ग्लेजर यांनी काढले आहेत. सरकारी पक्ष तिच्यावरील गुन्हा सिद्ध करू शकेल असे मी म्हणणार नाही, परंतु या सुनावणीच्या उद्देशाने संभाव्य कारणासाठी हा पुरेसा पुरावा असल्याचे न्यायाधीशांनी नमूद केले. तर गॅब्रिएलाला 5 हजार डॉलर्सच्या रकमेवर जामीन मंजूर करण्यात आला आहे.