सामर्थ्यवंत विकासपुरुष
एक कणखर नेतृत्व भारताला लाभलेले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये 360 कलम जे चालू होते, ते घटनेतूनच काढून टाकण्याचे धारिष्ट्या, सामर्थ्य ज्या माणसामध्ये आहे, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी. कोणत्याही परिणामास धैर्याने तोंड देणारे आणि संघर्षमय जीवनातून या पदापर्यंत पोहोचलेले, असे देशासाठी कोणताही त्याग करण्याची मनापासून तयारी असलेला देशभक्त नेता म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा उच्चार केल्याशिवाय हे वाक्य पूर्ण होऊ शकत नाही. संघाच्या मुशीत वाढलेला, संस्कारक्षम जीवन जगलेला, संसाराचा त्याग केलेला आणि संपूर्ण देशाचा संसार सांभाळणारा, एक योद्धा नेता म्हणून या व्यक्तीकडे पाहावे लागेल. या देशवासियांची मान गर्वाने ताठ उभी राहावी, यासाठी या नेत्याने जे महान कार्य केलेले आहे, त्याचा विसर कधीही पडणे शक्य नाही. आज दिवसाकाठी देशात बाराशे किलोमीटर रस्त्याचे जाळे विणले जातेय, देशामध्ये अनेक बडे उद्योग येत आहेत, देशातील अनेक उद्योगपती आज विदेशात जाऊन आपल्या उद्योगांचा मोठ्या प्रमाणात विकास आणि विस्तार करीत आहेत. जागतिक पातळीवर भारतातील उद्योगपती, उद्योजक, अभियंते, डॉक्टर, वकील, वैज्ञानिक असे प्रत्येक क्षेत्रातील नामवंत मंडळी आज चमकत आहेत आणि विदेशामध्ये देखील त्यांना मोठ्या प्रमाणात मागणी निर्माण होत आहे. याचे कारण भारताने आपल्या मैत्रीचा विस्तार जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणात केलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, जगातील अनेक राष्ट्रांना भेटी देत आहेत. त्यांना अनेक राष्ट्रांमधून भेटीसाठी बोलावणे येतेय, अनेक राष्ट्रांकडून त्या राष्ट्राचा मोठा पुरस्कार हा भारताच्या पंतप्रधानांना प्राप्त होतोय, याचे कारण आहे नरेंद्र मोदी. विकासाचे फार मोठे पाऊल त्यांनी उचलले. जागतिक स्तरावर भारत मागे राहून चालणार नाही. उलट तो विकसित राष्ट्रांच्या पंगतीत बसला पाहिजे, हे त्यांचे स्वप्न प्रत्यक्षात गेल्या बारा वर्षांत साकार झालेले दिसत आहे. भारताचा झपाट्याने होत असलेला विकास, हे खरेतर मोठे उदाहरण आहे. अत्यंत नि:स्वार्थी भावनेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशासाठी असलेले योगदान, हे भारताच्या इतिहासात कायम नोंदविले जाईल. म्हणूनच आज आधुनिक भारताचा ‘विकास पुऊष’ म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घेतले जाते. आज भारतीय रेलसेवा ज्या पद्धतीने कार्य करीत आहे, ते पाहता सारे जग अचंबित होत आहे. भारतातील सर्व जाती-धर्मातील नागरिकांसाठी एकच कायदा आणि एकच न्याय, हे उद्दिष्ट ठेवल्यामुळे त्यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन देखील फार मोठ्या प्रमाणात टीका होत आहे मात्र या टीकेला ते काडीचीही किंमत देत नाही. जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, हे प्रत्यक्ष साकार करण्याचे कौशल्य आणि भारतात या भागाचा प्रत्यक्षात विलय करण्याचे महान कार्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून दाखविले. हे करत असताना ते टीकेचे धनी बनले परंतु अन्य कोणत्याही गोष्टीची त्यांनी पर्वा केली नाही. ‘देश प्रथम’ हे उद्दिष्ट राखताना इतर सर्व गोष्टी त्यांच्यासाठी गौण ठरल्या. त्यामुळेच आज जम्मू-काश्मीरमध्ये सर्वसामान्य भारतीयांना जगणे सहज शक्य झाले आहे. गुजरातमधील वडगाव येथे 1950 मध्ये जन्मलेले नरेंद्र मोदी यांचा एकंदरीत जीवन प्रवास हा संघर्षमय ठरला. अनेक मोठ्या संकटांना ते सहजपणे सामोरे गेले. त्यांच्यावर अनेकवेळा हल्लेदेखील करण्यात आले परंतु आपल्या सामर्थ्याने त्यांनी कोणत्याही गोष्टीची पर्वा न करता, देशाची सेवा हे उद्दिष्ट समोर ठेवले आणि भाजपचा एक साधा कार्यकर्तापासून पुढे आमदार बनले, त्यानंतर गुजरातचे मुख्यमंत्री बनले. तिथून 2014 मध्ये देशाचे पंतप्रधान बनले. आज 2026 पर्यंत ते पंतप्रधान म्हणून या देशाची धुरा यशस्वीरित्या सांभाळीत आहेत. संत रामदास स्वामींनी म्हटलेले आहे, ‘सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे।।’ परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. सामर्थ्यवान, कर्तृत्ववान अशा या नेत्याने जी चळवळ सुरू केली, त्यामध्ये स्वहिताला नर्मदेत बुडविले. देशहिताला पुढे आणले आणि या चळवळीबरोबरच भगवंताचा आशीर्वाद हा तेवढाच महत्त्वाचा आहे. ईश्वरी बळ, नीतीमूल्यांची जोड असल्यामुळेच आज एक यशस्वी पंतप्रधान म्हणून या नेत्याकडे पाहताना प्रत्येकाचा ऊर भरून येईल, अशीच ही कामगिरी आहे. राष्ट्रहित समोर ठेवून नि:स्वार्थीपणे या देशासाठी दिवस-रात्र राबणारा हा नेता आज जागतिक पातळीवर देखील एक बलाढ्या नेता बनलेला आहे. त्यांच्या शब्दाला जगात मान आहे. म्हणूनच जागतिक पातळीवर आज भारताला देखील फार मोठे स्थान प्राप्त झालेले आहे. या विकास पुऊषाचे महान कार्य देशाच्या सार्वभौमत्वासाठी, अखंडतेसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. विघटनवादी शक्तींचा बिमोड करण्यासाठी देखील पाठीचा कणा ताठ असणे आवश्यक आहे आणि हे केवळ नरेंद्र मोदी यांच्यामध्ये आहे. खरेतर देशासाठी नरेंद्र मोदी हा एक ‘जाणता राजा’ आहे.