‘खासगी’ वैद्यकीय महाविद्यालयावरून ‘राजकीय’ गदारोळ
प्रस्ताव त्वरित रद्द करण्याची मागणी : उत्तरे टाळत असल्याचा आरोप,हौद्यात उतरून विरोधकांची घोषणाबाजी
पणजी : दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात खासगी वैद्यकीय महाविद्यालय किंवा खासगी नर्सिंग महाविद्यालय स्थापन करण्यावरून गुऊवारी विधानसभेत विरोधकांनी जोरदार गदारोळ माजवला. तब्बल 500 कोटी ऊपये खर्च करून बांधण्यात आलेल्या या इस्पितळ इमारतीत खासगी वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करणे म्हणजे संबंधित संस्थेस फुकटात सुविधा देण्यासारखे आहे, असा आरोप करत हा प्रस्ताव त्वरित रद्द करण्यात यावा, अशी मागणी केली.
याच विषयावरून मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांनी दिलेल्या उत्तरांमध्ये प्रचंड तफावत असल्याचे आरोप विरोधकांनी केले. तसेच आरोग्यमंत्री विश्वजित राणे एकतर बेजबाबदार उत्तरे देतात किंवा उत्तरे देण्याचेच टाळतात, असे आरोप करत सभापतींच्या हौद्याकडे धाव घेतली. तेथे बराचवेळ त्यांनी ‘पावतो सा’ म्हणत घोषणाबाजी केली. त्यावेळी बोलताना आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी, सरकारकडून निर्माण करण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधा या लोकांसाठी असतात, खाजगी व्यक्ती किंवा संस्थांसाठी नसतात, असे स्पष्ट केले. मडगाव येथील हॉस्पिसिओची जुनी इमारत दुऊस्त करण्यास सरकारने प्रशासकीय मान्यता दिली आहे. तसेच त्याच इमारतीत नर्सिंग महाविद्यालय सुरू करण्यासही प्रशासकीय मान्यता दिली असल्याचे राणे यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात खासगी वैद्यकीय महाविद्यालय विचाराधीन आहे हे खरे असले तरी त्यासाठी आपण सीव्हीसी मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणार नाही. जे कोणी या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करतील त्यांना तुऊंगात जावे लागेल, असेही ते म्हणाले. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी बोलताना, दक्षिण गोव्यातील लोकांना मूलभूत वैद्यकीय सेवा प्राप्त व्हाव्यात या उद्देशाने काँग्रेस सरकारनेच वर्ष 2008-09 मध्ये दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ सुरू केले होते, असा दावा केला. अशावेळी या इमारतीत खासगी वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याच्या निर्णयाचे आम्ही कधीच समर्थन करणार नाही. त्याला आमचा सदैव विरोधच असेल, असे ते पुढे म्हणाले.
यावेळी बोलताना आमदार विजय सरदेसाई यांनी, दक्षिण गोवा जिह्यातील नागरिकांना अधिक चांगल्या वैद्यकीय सुविधा प्रदान करणे हा सदर इस्पितळ स्थापन करण्यामागील प्रमुख उद्देश होता. या इमारतीत खासगी वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करता यावे हे उद्दिष्ट कधीच नव्हते, असे ते म्हणाले. अशावेळी सदर खासगी वैद्यकीय महाविद्यालयास पुढील मान्यता देण्यापूर्वीच सदर प्रस्ताव रद्द करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. आरोग्यमंत्री राणे यांनी त्यावेळी बोलताना, सरकारने दक्षिण जिल्हा इस्पितळात आयसीयु सुविधा सुरू केली असून ती सुयोग्यरित्या कार्यरत असल्याचे सांगितले. 70-75 टक्के ऊग्णांवर या इस्पितळातच उपचार होतात. मात्र उर्वरित ऊग्णांना पुढील उपचारांसाठी बांबोळीत गोमेकॉत पाठविण्यात येतात, अशी माहिती त्यांनी दिली.
आपचे आमदार व्हेंझी व्हिएगास यांनी मंत्र्यांचे म्हणणे खोडून काढताना, दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ म्हणजे ऊग्णांना बांबोळीला पाठविणारे एक मध्यस्थ बनले आहे, असा आरोप केला. यासंबंधी यापूर्वीही आपण बोललो आहे आणि तेच सत्य आहे, असे ते म्हणाले. या इस्पितळातून 4 वर्षात एकूण 17425 तर विद्यमान वर्षात आतापर्यंत 2389 ऊग्णांना बांबोळीत पाठविण्यात आले आहेत, हा आपल्या दाव्याचा पुरावा असल्याचे व्हिएगश म्हणाले. अशाप्रकारे मोठ्या संख्येने ऊग्णांना गोमेकॉत आणि खास करून खासगी इस्पितळात पाठविण्याचे प्रकार कमी करण्यासाठी सरकारकडे कोणती योजना आहे, असा सवालही व्हिएगश यांनी उपस्थित केला. केपेचे आमदार एल्टन डिकोस्टा यांनी बोलताना, दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाच्या टेरेसवर ‘कॅथलॅब’ स्थापन करण्याच्या आरोग्य खात्याच्या प्रस्तावास जीएसआयडीसीने आक्षेप घेतला आहे, अशी माहिती दिली. या इमारतीत टेरेसवर स्लॅब टाकण्याची तरतूद नसल्यामुळे जीएसआयडीसीने हा आक्षेप घेतला असल्याचे ते म्हणाले.