अमेरिकेत मोठ्या हल्ल्याचा कट उधळला
पाकिस्तानी वंशाच्या विद्यार्थ्याला अटक
न्यूयॉर्क : अमेरिकेच्या डेलावेयर प्रांतात एका पाकिस्तानी वंशाच्या विद्यार्थ्याला अटक करण्यात आली आहे. आरोपीचे नाव लुकमान खान असून तो 25 वर्षांचा आहे. डेलावेयर विद्यापीठाचा तो विद्यार्थी आहे. अमेरिकेत सामूहिक गोळीबाराचा कट रचल्याप्रकरणी त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. लुकमानकडून मोठ्या प्रमाणात बंदुका, दारूगोळा आणि बॉडीआर्मर हस्तगत करण्यात आले आहे. तसेच त्याचे नोटबुकही जप्त करण्यात आले असून यात सर्वांना ठार करण्याच्या कटाचा उल्लेख आहे. अतिरिक्त शस्त्रास्त्रs कशी प्राप्त करावी, सामूहिक गोळीबारात त्यांचा वापर कसा करावा आणि हल्ल्यानंतर पोलीस-एफबीआयच्या तपासापासून कसे वाचावे याचा सविस्तर उल्लेख हस्तलिखित नोटबुकमध्ये आहे. डेलावेयर विद्यापीठ पोलीस स्थानकाचा लेआउट, एंट्री-एक्झिट-वे आणि पोलीस अधिकाऱ्याचे नावही त्यात नमूद आहे. नोटबुकमध्ये हल्ल्याचे कट आणि युद्धतंत्रज्ञान लिहिले गेले होते. डेलावेयर विद्यापीठात सामूहिक गोळीबाराचा कट त्याने रचला होता, परंतु तो वेळीच हाणून पाडण्यात आला आहे. लुकमान खानचा जन्म पाकिस्तानात झाला होता, परंतु तो सध्या अमेरिकेचा नागरिक आहे. एफबीआयने त्याच्या विलमिंग्टन येथील घरावर छापा टाकत एआर-स्टाइलची रायफल हस्तगत केली आहे. तसेच ग्लॉक पिस्तुलही मिळाले आहे. याचबरोबर बुलेटप्रूफ जॅकेटही त्याच्या घरात सापडले आहे.