किडनी व्हॅली’च्या नावाने प्रसिद्ध ठिकाण
किडनी आमच्या शरीरातील महत्त्वाचा अवयव आहे. जर एक किडनी खराब झाली, तर दुसऱ्याच्या मदतीने माणूस जिवंत राहू शकतो. परंतु एक असे गाव आहे, जेथील बहुतांश लोक केवळ एका किडनीच्या आधारावर जगत आहेत. नेपाळमध्ये हे गाव असून तेथील लोक दशकांपासून केवळ एका किडनीच्या आधारावर जगत आहेत. हे गाव अत्यंत गरीब आहे, याचमुळे पैशांसाठी लोक एक किडनी विकत असतात.
स्वत:च्या शरीराची काळजी न घेता येथील लोक किडनी विकतात, याचमुळे या गावाला किडनी व्हॅली नावानेही ओळखले जाते. या गावाचे मूळ नाव होकसे आहे. 2015 मध्ये नेपाळमध्ये झालेल्या विध्वंसक भूकंपानंतर येथील स्थिती अत्यंत खराब झाली होती. घरं जमीनदोस्त झाली होती आणि दुकानंही कोसळली होती.
भूकंपात सर्वस्व गमाविलेल्या लोकांमध्ये मानवतस्करांनी स्वत:चा लाभ बघितला. बाहेरून आलेल्या लोकांनी प्रथम येथील लोकांना आर्थिक मदत केली, मग शारीरिक संरचनेविषयी चुकीची माहिती दिली. येथील लोकांना शरीरात दोन किडन्या असल्याचे सांगत दुसरी किडनी कुठल्याही कामाची नसते अशी खोटी माहिती या लोकांना देण्यात आली. या खोट्या माहितीला खरे मानत येथील लोकांनी पैशांसाठी एक किडनी काढत तस्करांना दिली. यातून त्यांना पैसे मिळू लागले. आजही येथील बहुतांश लोक 18-20 वयातच किडनी विकतात. आता तर या गावात ही प्रथाच ठरत चालली आहे.