बुजवडेत थेट पाईपलाईनचा व्हॉल्व्ह फुटला
लाखो लिटर पाणी वाया
वारंवार होणाऱ्या गळतीने कामाबाबत प्रश्नचिन्ह
कोल्हापूर
काळम्मावाडी धरणातून कोल्हापूर शहराला थेट पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनचा राधानगरी तालुक्यातील बुजवडे हद्दीत शुक्रवारी सकाळी अचानक व्हॉल्व्ह फुटला. यामुळे दुधगंगा डाव्या कालव्याचा वरील बाजूस असणाऱ्या पाईपलाईनमधून लाखो लीटर पाणी वाया जाऊन कालव्याला गढुळ पाण्याचा तुंब आला आहे. तसेच या पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे याठिकाणी विहीरीएवढ्या आकाराचे मोठे भगदाड पडले आहेत.
काळम्मावाडी धरणाच्या बॅंक वॉटरमधून कोल्हापूर शहराला थेट शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी सुमारे सहा फुट व्यासाची थेट पाईपलाईन जमिनीखालून टाकली आहे. ठिकठीकाणी एअर व्हॉल्व्ह बसविले आहेत. त्यातून काहीप्रमाणात पाणीगळती सुरू असून बुजवडे याठिकाणी पाईपलाईनला यापूर्वी काहीशी गळती सुरू होती. शुक्रवारी सकाळी अचानक नऊ वाजता व्हॉल्व्हमधून मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाली व अचानक व्हॉल्व्ह फुटला व भगदाड पडून पाण्याचा लोंढा कालव्यात येऊन मिसळला. या पाईपलाईनमधून पाणी बंद करेपर्यंत लाखो लीटर पाणी वाया गेले आहे. तसेच जमिनीचाही काही भाग तुटला आहे. घटनास्थळी संबंधित पाईपलाईन कंपनीचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाले असून दुरुस्तीचे काम सुरू केले आहे.
पाईपलाईनचे दर्जाहिन काम
काळम्मावाडी धरणातून कोल्हापूरला पाणी नेण्यासाठी थेट पाईपलाईन योजना करण्यात आली. या योजनेचे काम सुरू असताना पाहणीत अनेक ठिकणी गुणवत्ता नसल्याचे दिसून येत होते. याबाबत काम सुरू असताना तत्कालीन महापालिका आयुक्त बलकवडे, संबंधित विभागाचे अधिकारी माळी यांच्याकडे तक्रार केली होती. परंतु त्यांनी दखल घेतली नाही. त्यामुळे आज अशा प्रसांगाना सामोरे जावे लागत आहे.
नंदकिशोर सुर्यवंशी
माजी संचालक बिद्री साखर कारखाना