For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Solapur Crime News | काळजाचा तुकडा फेकला जमिनीवर!

03:37 PM May 19, 2026 IST | NEETA POTDAR
solapur crime news   काळजाचा तुकडा फेकला जमिनीवर
Advertisement

पोटच्या मुलीविरुद्ध आईने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला

Advertisement

कुर्डुवाडी  : रडत असलेल्या अवघ्या २२ दिवसांच्या नवजात बाळाला आईनेच रागाच्या भरात थेट जमिनीवर फेकून दिल्याची धक्कादायक घटना माढा तालुक्यातील पिंपळनेर येथे उघडकीस आली आहे. यामध्ये बाळाच्या उजव्या हाताचे मनगट आणि दंडाचे हाड फॅक्चर झाले आहे.

याप्रकरणी बाळाच्या आजीने (आईच्या आईने) स्वतःच्या पोटच्या मुलीविरुद्ध कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पिंपळनेर (ता. माढा) येथील रहिवासी जयश्री हनुमंत दीक्षित (वय ४५) यांची मोठी मुलगी प्राची हिचे लग्न चार वर्षांपूर्वी उरुळी कांचन (ता. हवेली, जि. पुणे) येथील दशरथ हनुमंत पंडित यांच्याशी झाले आहे.

Advertisement

प्राची बाळंतपणासाठी माहेरी पिंपळनेर येथे आली होती. २२ एप्रिल रोजी तिने एका मुलाला जन्म दिला होता. ६ मे रोजी रात्री जेवण करून सर्व कुटुंब झोपले होते. ७ मे रोजी पहाटे तीनच्या सुमारास नवजात बाळ मोठ्याने रडत होते. याचा राग आल्याने प्राचीने बाळाला हातावर घेऊन थेट जमिनीवर टाकून दिले.

हा प्रकार प्राचीची लहान बहीण संस्कृती हिने प्रत्यक्ष पाहिला. सकाळी तिने हा धक्कादायक प्रकार आपली आई जयश्री यांना सांगितला. घटनेचे गांभीर्य ओळखून आजी जयश्री, संस्कृती यांनी बाळाला टेंभुर्णी येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले.

तेथे डॉक्टरांनी तपासणी करून एक्स-रे काढला असता, बाळाच्या उजव्या हाताचे मनगट आणि दंडाचे हाड फ्रॅक्चर झाल्याचे निष्पन्न झाले. यानंतर जयश्री दीक्षित यांनी तात्काळ आपले जावई दशरथ पंडित यांना फोनवरून घटनेची माहिती देऊन पिंपळनेर येथे बोलावून घेतले.

२२ दिवसांच्या बाळाला दुखापत करून क्रूरतेची सीमा गाठणाऱ्या मुलगी प्राची दशरथ पंडित (वय २३) हिच्याविरुद्ध अखेर आई जयश्री दीक्षित यांनी कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या घटनेमुळे संपूर्ण माढा तालुक्यात संताप व हळहळ व्यक्त होत असून, कुर्डुवाडी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Advertisement
Tags :

.