ईश्वरप्राप्तीची माणसाला अपूर्वाई वाटत नाही
अध्याय नववा
लोक नास्तिक हा धर्म अश्रद्धेने न सेविती। मृत्यूची धरिती वाट संसारी मज सोडुनी।। 3 ।। हा श्लोक आपण अभ्यासत आहोत. त्यानुसार, आत्मज्ञानाकडे दुर्लक्ष करून विषयसुखाला श्रेष्ठ मानणाऱ्या लोकांची धर्मावर श्रद्धा नसते. हे नास्तिक लोक हलक्या विचारसरणीचे असून मूर्ख आणि दुराचारी असतात. मी त्यांच्या हृदयात वास करून आहे हे ते लक्षातच घेत नाहीत. त्यामुळे ते सर्वश्रेष्ठ अशा आत्मज्ञानापासून मिळणाऱ्या सुखाला म्हणजे आत्मसुखाला मुकतात. मी व माझे ह्या भावनेच्या प्रभावाने कमकुवत विचारसरणीचे लोक मला येऊन मिळण्याचे विसरतात आणि जन्म व मरण नावाचे या दोन काठ असलेल्या मायानदीतून संसारातील धक्के खात वहात राहतात. हा त्यांचा प्रवास अनेक जन्म चालू राहतो. ज्याला संसारात रुची आहे त्याला मी कर्ता आहे आणि समोर दिसणाऱ्या गोष्टी माझ्या आहेत ही भावना पक्की झालेली असते. ती जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत ईश्वरप्राप्ती करून घेणे हे जीवनातील सर्वोच्च ध्येय आहे ही भावना त्यांच्या मनात पक्की होत नाही.
दिवसा सूर्य दिसतो आणि रात्री दिसत नाही म्हणजे सूर्यासारख्या तेजस्वी वस्तुतही काहीतरी कमीपणा आहे मग इतर वस्तूंत काही ना काही कमीपणा असणार हे उघडच आहे. फक्त मनुष्य त्याला अपवाद आहे कारण त्याच्या अंत:करणात मी वसत असल्याने तोही माझ्याप्रमाणे परिपूर्ण आहे. तसं बघितलं तर सर्व सजीवनिर्जीवात मी असतोच परंतु मनुष्यप्राण्याला मी दिलेल्या विचारशक्तीमुळे तो हे ओळखू शकतो आणि त्याप्रमाणे त्याची भावना पक्की करून माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करू शकतो पण खेदाची गोष्ट अशी की, असा काही विचार करावा असे त्याच्या मनातसुद्धा येत नाही ह्याला लाखात एखाद्याचा अपवाद असतो. कारण उघड आहे, प्रत्येकाला संसार सुखाची ओढ असल्याने तो प्रपंचातल्या वस्तूत आणि बायकामुलात रमतो. त्याला माझ्याकडे पहायलाही फुरसत नसते मग माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करणे तर दूरच. म्हणून अर्जुना माझ्या प्राप्तीतून मिळणारे आत्मसुख कमी कष्टात मिळणारे असले तरी मनुष्याला त्याची अपूर्वाई वाटत नाही. परिणामी त्यांचे जन्म-मरणाचे फेरे चालूच राहतात. सर्व माणसे ही भगवंतांची लेकरे असल्याने त्यांच्यावर त्यांचे फार प्रेम असते त्यामुळे लोकांच्या चित्रविचित्र वागण्याकडे दुर्लक्ष करून ते त्यांचे भले कसे होईल ह्या विचारात सदोदित असतात. मनुष्य मात्र त्यांचे प्रेम ओळखू शकत नसल्याने त्यांची भेट घडावी असा विचार न करता आपापल्या प्रपंचात मश्गुल झालेला असतो. भगवंतांना मात्र त्याने त्यांच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करू नये ह्याचे फार दु:ख होते. वास्तविक प्रपंचातल्या गोष्टी मिळवण्यात मनुष्य एव्हढे कष्ट करतो की, त्यात त्याचे आयुष्य संपून जाते. ह्या गडबडीत आपले आयुष्य आपण वाया घालवले याची त्याला फिकीर नसते. प्रपंचातल्या कष्टाच्या तुलनेत ईश्वर प्राप्तीसाठी कमी कष्ट करावे लागतात पण हे तो लक्षात घ्यायला तयारच नसतो.
क्रमश:
