दुचाकी चोरणारा अट्टल चोरटा अटकेत
कोल्हापूर :
चैनीसाठी दुचाकी चोरणाऱ्या रेकॉर्डवरील एका गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली. दीपक पांडूरंग वाघमारे (वय 31, मुळ रा. चिकुर्डे सध्या रा. शिरटेकर चाळ, इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून 7 लाख 5 हजार ऊपये किंमतीच्या चोरीच्या 12 दुचाकी जप्त करण्यास कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना यश आले. या दुचाकी त्याने कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तीन जिह्यातून चोरल्या आहेत, अशी माहिती कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिली.
दुचाकी चोरणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार दीपक वाघमारे हा चोरीची दुचाकी घेऊन, शिये (ता. करवीर) गावालगतच्या श्री रामनगर येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावऊन सापळा लावून गुन्हेगार त्याला नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीसह पकडले. चौकशीमध्ये ही दुचाकी त्याने कोल्हापूर शहरातील लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरल्याची माहिती दिली. त्याला न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी मिळाली.
आठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 12 दुचाकींची चोरी
वाघमारेला अटक करीत लक्ष्मीपूरी, शाहूपूरी, कोडोली, हातकणंगले या चार पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीच्या पाच दुचाकी, सातारा जिह्यातील सातारा शहर, कराड शहर या दोन पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीच्या पाच दुचाकी आणि सांगली जिह्यातील शिराळा, इस्लामपूर या दोन पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीच्या दोन अशा 12 दुचाकी जप्त करण्यात आल्या.